नवी दिल्ली : विशाखापट्टणम येथील एलजी पॉलिमर्स प्रकल्पातील वायुगळतीच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा’ने (एनडीएमए) लॉकडाउननंतर उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विशाखापट्टणम येथील दुर्घटनेत १२ लोक मरण पावले आहेत.‘एनडीएमए’ने म्हटले की, ‘लॉकआउट अथवा टॅगआउट प्रोसिजरअभावी अनेक ऊर्जास्रोत चालक अथवा पर्यवेक्षकांसाठी घातक ठरू शकतात. विशेषत: इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अथवा रासायनिक उपकरणे चालविणारे कामगार आणि त्यावर निगराणी ठेवणारे पर्यवेक्षक यांना अधिक धोका आहे. ‘एनडीएमए’ने म्हटले की, अवजड यंत्रे आणि उपकरणांची नियमित देखभाल झाली नाही, तर ते चालक अथवा अभियंत्यांसाठी ते घातक बनू शकतात. ज्वलनशील द्रावण, विषारी वायू, उघडे वायर, कन्व्हेयर बेल्ट आणि स्वयंचलित वाहने उत्पादन प्रकल्पात मोठी जोखीम निर्माण करू शकतात.अयोग्य सुरक्षा संहिता आणि चुकीच्या लेबलखालील रसायने हा धोका आणखी वाढवू शकतात.‘एनडीएमए’ने म्हटले की, अशा परिस्थितीत प्रकल्प पुन्हा सुरू करताना सर्वोच्च पातळीवरील खबरदारी घेणे आवश्यक आहे. पहिल्या आठवड्यात सर्व यंत्रणांची केवळ चाचणी घेण्यात यावी. सर्व सुरक्षात्मक यंत्रणांची खात्री करून घेतली जावी. चाचणी काळात उत्पादनाचे मोठे उद्दिष्ट कुठल्याही परिस्थितीत ठेवले जाऊ नये. कर्मचाऱ्यांना बाधा होऊ नये यासाठी योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. कार्यस्थळी यंत्रांचा विचित्र आवाज अथवा वास, उघडे वायर, घर्षण, गळती, धूर इत्यादी असामान्य बाबी धोक्याची सूचना देणाºया आहेत, याची जाणीव सर्वांना करून द्यायला हवी. असे प्रकार आढळल्यास तातडीने देखभाल-दुरुस्ती करून घ्यावी. गरज भासल्यास प्रकल्पच बंद करण्यात यावा....
coronavirus: देशात उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:35 AM