लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोविड-१९शी संबंधित दाव्यांत मोठी वाढ झाल्यामुळे आरोग्य विम्याच्या हप्त्यात २० टक्के वाढ होऊ शकते, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.
एका आरोग्य विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत झालेल्या विक्रमी वाढीमुळे आरोग्य विमा कंपन्यांच्या मिळकतीत २० टक्क्यांनी घट झाली आहे. ही घट भरून काढण्यासाठी कंपन्या हप्त्यांत वाढ करण्याचा विचार करीत आहेत. हप्त्यांतील वाढ नव्या पॉलिसींसाठी लागू होईल. सूत्रांनी सांगितले की, २०२० मध्ये कोविड-१९शी संबंधित विमा उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. इतर सर्वंकष संरक्षण पॉलिसींनीही उत्तम व्यवसाय केला. त्यामुळे आरोग्य विमा कंपन्यांचा महसूल ४० हजार कोटींवर पोहोचला.
वित्तवर्ष २०२१ मध्ये एकत्रित सकळ हप्ता १५-२० टक्क्यांनी अधिक राहिला. मात्र एकूण दाव्यांत मूल्याच्या बाबतीत ३० टक्के दावे कोविड पॉलिसींशी संबंधित होते. सूत्रांनी सांगितले की, एकूण दाव्यांची एकत्रित वाढीव रक्कम २५ हजार कोटींपेक्षा कमी असणार नाही, असा अंदाज आहे. त्याचवेळी साथीमुळे अनेकांनी आपल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याने इतर आजारांशी संबंधित दाव्यांत कपात झाली. त्यामुळे शुद्ध उत्पन्नावरील परिणाम सुमारे १५ हजार कोटी रुपये असेल. कोविड विम्यांचे दावे असेच वाढत राहिले, तर कंपन्यांना हप्तेवाढ करण्यासाठी इरडाईशी संपर्क केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
सप्टेंबर महिन्यातील दाव्यांची संख्या सर्वाधिक
मार्चनंतर दाव्यांत वाढ झाली आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये दाव्यांची संख्या सर्वाधिक होती. हे दाव्याचे सर्वोच्च शिखर असेल, असे आम्हाला वाटले होते. तथापि, आता दावे सप्टेंबरच्या तुलनेत दुप्पट झाले आहेत. आधीच्या वित्तवर्षात कोविड-१९ शी संबंधित १७ हजार कोटींचे आरोग्य विमा दावे करण्यात आले होते.