नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन, कडक निर्बंध असे विविध उपाय केले जात आहेत. मात्र यामुळे देशाची आर्थिक गती मंदावली आहे. देशाची अर्थव्यवस्था वाचवायची असेल तर आता नोटा छापण्याची गरज आहे असं मत भारतीय उद्योग संघटनेचे अध्यक्ष उदय कोटक यांनी व्यक्त केले आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे संचालक असलेल्या उदय कोटक यांनी सांगितले की, केंद्र सरकारने या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी तळागाळातील लोकांना थेट मदत करणं आवश्यक आहे. सर्वाधिक फटका बसणाऱ्या क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्या वाचवायला हव्यात. सरकारने गरिबांच्या हातात पैसे द्यावेत. यावर जीडीपीचा १ टक्का खर्च करावा लागेल. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आता सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI)च्या मदतीनं बँलेन्स शीटचा विस्तार करायला हवा. सरकारने व्यावसायिक सुधारणा करण्याचा विचार करावा. व्यवसाय दोन प्रकारचे आहेत. पहिलं महामारीमुळे ज्या क्षेत्रात बदल आवश्यक आहे तो आणि दुसरा म्हणजे ज्यांचं व्यावसायिक मॉडेल बदलल्यामुळे ते काम करू शकत नाहीत. त्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येकाला मदत करणं गरजेचे आहे. संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करावी जेणेकरून अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार नाही असंही उदय कोटक म्हणाले.
त्याचसोबत कोरोनाच्या संकटकाळात अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने बँकानांही त्रास सहन करावा लागत आहे. सरकारच्या पाठिंब्याने कर्जदारांनाही दिलासा देता येऊ शकतो. खासगी बँकांनी गेल्या वर्षभरापासून भांडवल उभे केले आहे. त्यामुळे आधीपेक्षा बँकांची भांडवली परिस्थिती सुधारलेली आहे. भांडवल हे आर्थिक क्षेत्राचं ऑक्सिजन आहे. बँकांनी कर्जदारांच्या रक्कमेचं पूनर्रचना केली पाहिजे. ते झाले तर त्यात सुधारणा होण्याची चांगली क्षमता आहे असं उदय कोटक म्हणाले.