नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व आर्थिक व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे सरकारला मिळणाऱ्या महसुलावर विपरीत परिणाम झाला आहे. घटलेले आर्थिक स्रोत आणि अर्थव्यवस्थेचा डोलारा सावरण्याचे आव्हान या पार्श्वभूमीवर भारतीय महसूल सेवेतील 50 अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांना पत्र लिहिले असून, या पत्राच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांनी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी काही शिफारशी केल्या आहेत.
यामध्ये देशातील श्रीमंत लोकांवर कोविड कर म्हणून 40 टक्क्यांपर्यंत कर घेण्याचा सल्ला या अधिकाऱ्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे ज्या लोकांचे उत्पन्न 1 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यांच्यावरील कर 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येऊ शकतो. तसेच बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झालेला संपत्ती कर पुन्हा सुरू करावा, 10 लाखांवर उत्पन्न असलेल्यांकडून 4 टक्क्यांपर्यंत कोविड-19 अधिभार घेण्यात यावा, असा सल्ला महसूल अधिकाऱ्यांनी दिला आहे.
तसेच गरिबांच्या खात्यात एका महिन्यात पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम थेट जमा करावी, आरोग्य क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्यांसाठी कर सवलत देण्यात यावी, असा सल्लाही या पत्राच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या उपायांमुळे लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीची काहीप्रमाणात भरपाई करता येईल, असे मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसात चिंताजनक पातळीपर्यंत वाढला आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1990 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होऊन ती 26 हजार 496 पर्यंत पोहोचली आहे. तर या 24 तासात देशभरात कोरोनामुळे 49 जणांचा मृत्यू आला आहे. तर याच काळात 741 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत देशात 5 हजार 804 कोरोनाबाधित पूर्णपणे बरे झाले आहेत.