नवी दिल्लीः कोरोना व्हायरसच्या संकटानं जगभरातील अर्थव्यवस्थांना मोठा धक्का बसला असून, अनेक देशात टाळेबंदी आहे. देशात कोरोनाचा फटका हा अनेक कंपन्यांना बसला आहे. कंपन्याच बंद असल्यानं कर्मचाऱ्यांना पगार देणार कुठून, असा प्रश्न अनेक कंपन्यांच्या मालकांसमोर आवासून उभा राहिला आहे. त्यातच आता इंडिया इंक या भारतातल्या कॉर्पोरेट कंपनीच्या व्यवस्थापनाने वेतनातून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्सच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने वेतनात सरासरी 35 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात ही वजावट होईल, असे कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. परंतु ही कपात कोरोनामुळेच झालेली असल्याचं कोणतीही सबब दिलेली नाही. कंपनीचा खर्च नियंत्रित करण्यासाठी ही कपात करण्यात आल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे.
कंपनीचे अध्यक्ष समीर गहलोत हेसुद्धा स्वतः पूर्ण पगार घेणार नाहीत, तर कंपनीचे उपाध्यक्ष, एमडी आणि सीईओ गगन बंगा यांच्या पगारामध्ये 75% कपात करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे कंपन्यांनाही सध्या टाळं ठोकलेलं आहे. या परिस्थितीतून कंपनीला बाहेर काढण्यासाठी अनेक कंपन्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने त्यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या आठवड्यात कोटक महिंद्रा बँकेचे एमडी उदय कोटक यांनी चालू आर्थिक वर्षात फक्त एक रुपयाच पगार घेण्याची घोषणा केली होती आणि सर्व वरिष्ठ व्यवस्थापन अधिका-यांच्या पगारामध्ये 15% कपात केल्याचंही सांगितलं होतं. त्याचप्रमाणे इंडिगो या विमान कंपनीनेही अव्वल व्यवस्थापनाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात कोरोना विषाणूच्या साथीमुळे झाली असली तरी, इंडिया बुल्सने त्याविषयी माहिती दिली नाही.
Coronavirus: कोरोनाच्या संकटामुळे 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका; 35 टक्के पगार कापणार
कंपन्याच बंद असल्यानं कर्मचाऱ्यांना पगार देणार कुठून, असा प्रश्न अनेक कंपन्यांच्या मालकांसमोर आवासून उभा राहिला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 12:17 PM2020-04-13T12:17:03+5:302020-04-13T12:35:40+5:30