नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गाचा सामना आपण सर्वांनी एकत्र येऊ न करायचा आहे. कोरोनामुळे देशवासीयांना घाबरून जाण्याचे कारण नाही. पण गर्दी करणे, निष्कारण घराबाहेर पडणे टाळायला हवे. पुढील काही आठवडे घरातून बाहेर जाऊ नका. गर्दी करण्याचे टाळण्यासाठी आपण सर्वांनी मिळून रविवार, २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चा प्रयोग करू या. त्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांनी घरातच राहू या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. त्यानंतर, रविवारी देशभरात अघोषित संचारबंदी लागू करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याच, पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. देशातील सर्वच पॅसेंजर रेल्वेगाड्या एक दिवसासाठी बंद राहणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार, देशातील सर्वच पॅसेंजर रेल्वे २१ मार्चच्या मध्यरात्रीपासून २२ मार्च रात्री १० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच, मेल आणि एक्सप्रेस सेवाही रद्द करण्यात येणार असून उपनगरीय सेवाही मोठ्या प्रमाणात बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, यापूर्वीच कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी जवळपास ९० रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून बंद ठेवण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांची माहिती तिकीट बुकींग केलेल्या प्रवाशांना देण्यात येत आहे, तसेच त्यांचे तिकीटाचे पैसेही परत करण्यात येणार आहेत.
रविवार २२ मार्च रोजी स्वयंस्फुर्ती संचारबंदी लागू झाल्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर, दिल्ली मेट्रोनेही एक दिवस मेट्रो बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. डीएमआरसीने कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून बचाव आणि जनजागृतीसाठी एक दिवस मेट्रो सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्वच मॉल, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, मेडिकल दुकान, किराणा दुकान आणि भाजीमार्केट यांना यातून वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना या बंदमधून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर सर्वच राज्यात ही स्वयंस्पूर्त संचारबंदी लागू करण्यासाठी इतरही राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडूनही अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
दरम्यान, हा जनता कर्फ्यूचा (जनतेतर्फे स्वयंस्फूर्त संचारबंदी) प्रयोग किती यशस्वी होतो, यावर पुढील पावले टाकता येतील, असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. म्हणजेच जनता कर्फ्यूला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहून सरकार पुढील उपाययोजना करेल, असे दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला उद्देशून केलेल्या अतिशय भावनिक भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या महिन्या - दीड महिन्यात १३0 कोटी भारतवासीयांनी ठामपणे कोरोनाचा सामना केला आहे. पण तेवढे पुरेसे नाही. त्यामुळे आपल्याला याहून अधिक सतर्क राहायला हवे. जागतिक महामारीच्या रूपाने पुढे आलेल्या कोरोनाच्या विषाणूंवर अद्याप औैषध सापडलेले नाही. त्यामुळे संकल्प व संयम पाळूनच आपणा सर्वांना मिळून कोरोनाला तोंड द्यायचे आहे.