मुंबई - जेआरडी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मी दिल्लीत होतो, मला या गोष्टीचा अतिशय आनंद झाला होता. मी मुंबईला येऊन ही बातमी जेआरडी यांना सांगितली. त्यावेळी, मी अद्याप एवढा मोठा पुरस्कार स्विकारण्यासाठी तयार नसल्याचे जेआरडी यांनी म्हटल होतं. मात्र, अखेर त्यांनी हा पुरस्कार स्विकारला, आजही आम्हाला त्या सन्मानाबद्दल खूप अभिमान वाटतोय, असे टाटा ग्रुपचे प्रमुख रतन टाटा यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. तसेच, जेआरटी यांच भारत देशावर खूप प्रेम होतं, भारतात जन्मल्याचा अभिमान त्यांना होता. जेआरडी हे टाटा ग्रुपचे मालक असूनही आयुष्यभर ते भाड्याच्या घरातच राहिले, अशी भावनिक आठवण रतन टाटा यांनी सांगितली.
देशात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊ करण्यात आले आहे. देशातील प्रत्येक नागरिक कोरोनाविरुद्धची लढाई लढत असून आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. टाटा ग्रुपने तब्बल १५०० कोटी रुपयांची मदत कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी देऊ केली आहे. आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि सुविधांसाठी ही रक्कम वापरावी, अशी इच्छाही टाटा यांनी व्यक्त केली आहे. टाटा यांच्या या दानशूरतेबद्दल सोशल मीडियावर टाटा यांचे देशवासियांनी आभार मानले. टाटा यांनी दाखवलेल्या दर्यादिलीवर नेटीझन्स फिदा झाल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच त्यांनी जेआरडी यांच्या आठवणी एका मुलाखतीत जागवल्या. त्यावेळी, जेआरडी हे मला वडिलांप्रमाणे होते, असे रतन टाटा यांनी म्हटले.
जेआरडी हे साधारणपणे आपलं जीवन जगत, एकदा चित्रपटाला गेल्यानंतर चक्क रांगेत उभे राहून त्यांनी माझं आणि त्यांचं तिकीट घेतलं होत. त्याकाळी, मीडिया एवढ्या प्रमाणात नसल्याने लोकही त्यांना ओळखत नसत. एअर इंडियाचे प्रमुख असतानाही ते आपलं सामान स्वत: घेऊन जात. गरजवंतांना मदत करण्यास जेआरडी यांना सर्वाधिक आनंद मिळायचा. टाटा, समुहाबद्दल कुणी चांगले विचार व्यक्त केले की त्यांना समाधान वाटायचं. देशासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलंय, भारतीय असल्याचा त्यांना अभिमान होता, ते खरे देशभक्त होते. ते स्वत:साठी जगलेच नाहीत. टाटा ग्रुपचे अध्यक्ष असूनही ते आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिले, अशी भावनिक आठवणही रतन टाटा यांनी यावेळी सांगितली. माझ्या पाठिशी ते कायम उभे राहिले, अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचं मला मार्गदर्शन मिळालं, त्यांच्याकडून कायम माझ्या स्वप्नांच समाधान होत राहिलं, असेही रतन टाटा यांनी सांगितलं.
दरम्यान, देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टकडून नेहमीच योगदान दिलं जाते. गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठं संकट म्हणून सध्या कोरोना आणि देशातील लॉकडाऊनकडे पाहिलं जातंय. या संकटासाठी अनेक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था पुढाकार घेत आहेत. आपल्यापरीने प्रत्येक संस्था, व्यक्ती कोरोनाच्या लढाईत मदत करत आहे. कुणी, व्यक्तिश:, कुणी लहान-सहान गरजूंना अन्न पुरवतही आपलं योगदान देत आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना मदतीचं आवाहन केलंय. मोदींच्या आवाहनला मोठा प्रतिसाद देशभरातून मिळत आहे. रतन टाटा यांनी ५०० कोटींची मदत टाटा ट्रस्टकडून जाहीर केली होती. त्यानंतर, टाटा सन्सकडून कोरोनाच्या लढाईसाठी आणखी १ हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.