नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम केअर्स फंडाची स्थापना केली असून, अनेक उद्योगपतींनी त्यासाठी भरभरून दान केलं आहे. या फंडाला मदत करण्यासाठी अनेक व्यावसायिक आणि कलाकारही पुढे सरसावले आहेत. जो तो आपापल्या परीनं या फंडाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. टाटा समूह आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहानं या फंडाला भरघोस मदत जाहीर केली आहे. त्यानंतर आता कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फंडाला कोट्यवधींचं दान केलं आहे.
उदय कोटक यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षात पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षभर पगाराच्या स्वरूपात केवळ १ रुपया घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता उदय कोटक यांनी हा निर्णय घेतला आहे. उदय कोटक यांच्याशिवाय त्यांच्या समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांच्या पगारामध्ये १५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकेने गुरुवारी निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, 'कोटक महिंद्रा बँक समूहातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांच्या एका गटानं कोरोनाविरोधातील लढ्यासाठी त्यांच्या पगारात १५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात २०२१ या आर्थिक वर्षासाठी लागू असेल. या निवेदनात असेही म्हटले होते की, उदय कोटक यांनी स्वतः पगार म्हणून केवळ १ रुपया घेण्याचे ठरविले आहे.Kotak Mahindra Bank's Uday Kotak opts to forego compensation for FY21, will receive Re 1.
— CNBC-TV18 (@CNBCTV18Live) April 9, 2020
Do note, Kotak has contributed Rs 25 cr to the #PMCARES Fund while Kotak Mahindra Bank has contributed Rs 25 cr to the #PMCARES Fund and Rs 10 cr to the relief efforts in Maharashtra pic.twitter.com/cCO7x7UIvv
पीएम केअर फंडामध्येही केलं दान
कोटक समूहाने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी इतर प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली आहे. कोटक महिंद्रा बँकेने पीएम केअर्स फंडात २५ कोटी रुपये देणगीच्या स्वरूपात दिले आहेत. तसेच महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दहा कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर उदय कोटकदेखील व्यक्तिगत स्वरूपात २५ कोटी रुपयांचं दान करणार आहेत.