Coronavirus Pandemic Affected Business : कोरोना विषाणूची महासाथ आणि त्याच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन त्यामुळे अनेकांना मोठं नुकसान सोसावं लागत आहे. छोट्या आणि मध्यम स्वरूपाच्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. इतकंच नाही तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यांच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. यापैकी काही लोकं अशीही आहेत, जे पहिले दुसऱ्यांना रोजगार देत होते. परंतु आता तेच आपलं घर चालवण्यासाठी रोजगार शोधण्यासाठी असहाय्य झाले आहेत.
मोहम्मद शाहिद नावाचा व्यक्ती धारावी परिसरात एक कपडे तयार करण्याचं छोटं युनिट चालवतो. परंतु कोरोना आणि त्यानंतर लावण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे कामकाज ठप्प झालं आहे. आपली कहाणी सांगताना त्याच्या डोळ्यात अश्रूही आले. एनडीटीव्हीनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. तो आपल्या युनिटमध्ये पँट आणि शर्ट तयार करत होता. एक अशी वेळ होती जेव्हा त्याच्या युनिटमध्ये ३५६ जण काम करत होते. तसंच त्यावेळी त्याची महिन्याला दीड लाखांची बचतही होत होती. पहिले नोटबंगी आणि त्यानंतर जीएसटी, आता कोरोना यानं सर्वकाही नेस्तनाभूत केल्याचं त्यानं सांगितलं. आता त्याच्यावर कर्जही आणि युनिटमध्ये केवळ दोन जण काम करतात. त्यापैकी एक त्याचे वडिलच आहेत.
"एक अशी वेळ होती जेव्हा आम्ही महिन्याला दीड लाख रूपये वाचवत होतो. आता अशी वेळ आली आहे की तेवढंच द्यावं लागत आहे. काहीच शिल्लक राहत नाही. लॉकडाऊनच्या कालावधीत आम्ही आमच्या कारागिरांना महिन्याचा खर्च दिला. त्यावेळी लॉकडाऊन किती कालावधीसाठी लागेल हे स्पष्ट नव्हतं," असं शाहिदचा भाऊ खालिद यानं सांगितलं. आता त्याचं युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहे. तसंच लवकरच आपल्याला नोकरी शोधावी लागेल असंही खालिद म्हणाला. मुंबईतीलधारावी परिसरात एकेकाळी तब्बल १ अब्ज डॉलर्सचा व्यवसाय होत होता. गार्मेंट्स असोसिएशननुसार आता लॉकडाऊननंतर काही ठराविकच युनिट्स सुरू आहेत.
६५ टक्के कारखाने बंद
"संपूर्ण धारावी परिसरात ६०० ते ७०० कारखाने होते. परंतु लॉकडाऊननंतर त्यातील ६५ टक्के कारखाने बंद झाले. आता संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत चर्चा सुरू आहे, त्यामुळे जर लॉकडाऊन लावण्यात आला तर सध्या सुरू असलेल्यांपैकी ३५ टक्के कारखानेही बंद होती. या ठिकाणची परिस्थिती अधिक खराब होईल," असं धारावी मार्केट असोसिएशनचे महासचिव कलिम अन्सारी यांनी सांगितलं.