मुंबई : देशामध्ये सुरू झालेल्या लॉकडाउननंतर बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, हा दर आता २७ टक्क्यांवर पोहोचला आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामधील बेरोजगारीचा दर जास्त असल्याचेही स्पष्ट झाले आहे. महाराष्टÑातील बेरोजगारीचे प्रमाण २०.९ टक्के आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने ३ मे अखेरच्या आठवड्यापर्यंतची माहिती विचारात घेऊन हा अहवाल तयार केला आहे. देशात लॉकडाउन सुरू झाले, त्यावेळी बेरोजगारीचे प्रमाण ७ टक्क्यांपर्यंत होते. लॉकडाउनच्या काळामध्ये बेरोजगारी वाढली आहे. सध्या भारतातील बेरोजगारीचे प्रमाण २७.११ टक्के झाले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामधील बेरोजगारी ही अधिक असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण २६.६९ टक्के, तर शहरी भागात २९.२२ टक्के आहे.
लॉकडाउननंतर महानगरामधील उद्योगधंदे बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेक स्थलांतरित हे पुन्हा आपल्या मूळगावाला परतले आहेत.
पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक ७५.८ टक्के आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडू (४९.९ टक्के), झारखंड (४७.१ टक्के) आणि बिहार (४६.६ टक्के) यांचा क्रमांक लागतो. डोंगराळ भागातील राज्यांमध्ये मात्र बेरोजगारीचा दर खूपच कमी आहे. हिमाचल प्रदेश (२.२%), सिक्किम (२.३%), उत्तराखंड (६.५%) ही राज्ये तळाला आहेत.