नवी दिल्ली : कोराेना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ हाेत असल्याने महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, या निर्णयामुळे वाहन क्षेत्राची चिंता वाढली आहे. अलीकडच्या काळात वाढलेली मागणी पुन्हा एकदा घटण्याची भीती वाहन उत्पादक आणि विक्रेत्यांना वाटू लागली आहे. राज्यात दरराेजी रुग्णसंख्या ५० हजारांवर गेली आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येने सरकारची चिंता वाढविली आहे.परिणामी महाराष्ट्रात कडक निर्बंध आणि वीकेंड लाॅकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय दीर्घ कालावधीसाठी लांबल्यास वाहन विक्रेत्यांचे माेठे नुकसान हाेणार आहे. अनेक कार आणि दुचाकी विक्रेत्यांना शाेरूमला टाळे लावावे लागेल, अशी परिस्थिती ओढावू शकते. गेल्या वर्षी लाॅकडाऊनमुळे आधीच वाहन विक्रेत्यांना मंदीने ग्रासले हाेते. सप्टेंबरपासून वाहन क्षेत्राची गाडी पुन्हा रुळावर आली हाेती. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वाहन विक्रीचे आकडे दिलासा देणारे हाेते. तरीही गेल्या वर्षीच्या प्रभावातून विक्रेते अद्याप सावरलेले नाहीत. गुढीपाडव्याचा मुहूर्त हुकणारदेशभरातील कार आणि एसयूव्ही विक्रीपैकी महाराष्ट्राचा १५ ते २० टक्के वाटा असताे. दुचाकी विक्रीतही महाराष्ट्राचा सुमारे २० ते २५ टक्के वाटा असताे. काही दिवसांनी गुढीपाडवा आहे. या दिवशी माेठ्या प्रमाणात वाहनविक्री हाेते. मात्र, राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे या दिवशी हाेणारी वाहन विक्री संकटात आली आहे. आता हाेणारे नुकसान नंतरच्या काळात भरून येण्याची शक्यता कमीच आहे. उत्पादक कंपन्यांनी राज्यातील परिस्थिती पाहता सरकारच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. मात्र, या क्षेत्रावर पुन्हा मंदीचे सावट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. २०२०-२१ आर्थिक वर्षात वाहनविक्रीत २५-२७ टक्के घट १.९ काेटी एकूण वाहन विक्री
CoronaVirus Lockdown News: महाराष्ट्रातील निर्बंधांनी वाढवली वाहन क्षेत्राची चिंता; मंदीचा धाेका, विक्रीवर परिणामाची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 2:56 AM