Join us

Coronavirus: बापरे! कोरोनामुळे उद्योजकांच्या संपत्तीत मोठी घट; जगातील १०० सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत एकच भारतीय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 3:47 PM

शेअर बाजारात 25 टक्क्यांची घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 5.2 टक्क्यांनी घसरल्यामुळे भारताच्या अव्वल उद्योगपतींना मोठा धक्का बसला आहे,

ठळक मुद्देमुकेश अंबानींच्या संपत्तीत घट होण्यामागे तेल कंपनीचा मोठा वाटागेल्या दोन महिन्यात अंबानींच्या संपत्तीत २८ टक्क्यांनी घटअंबानींसह गौतम अदाणी, शिव नादर, उदय कोटक यांनाही फटका

मुंबई – जगात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाचा परिणाम देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानीच्या संपत्तीवरही झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 28 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याच्याकडे सध्या 48 अब्ज अमेरिकन डॉलर्सची संपत्ती आहे. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे त्यांच्या संपत्तीतील ही घट दिसून आली आहे.

हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांची संपत्ती फेब्रुवारी-मार्चच्या कालावधीत 19 अब्ज डॉलर्सने घटली आहे. यामुळे ते जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आठ स्थानांवरुन घसरून 17 व्या स्थानावर आले आहेत. या रिपोर्टनुसार मुकेश अंबानी यांच्यासह गौतम अदाणी, शिव नादर आणि उदय कोटक यांच्या संपत्तीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. गौतम अदाणी यांच्या संपत्तीत 6 अब्ज डॉलर म्हणजे ३७ टक्के घट झाली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नादर यांच्या संपत्तीत 5 अब्ज डॉलर म्हणजे २६ टक्के, बँकर उदय कोटक यांच्या संपत्तीत 4 अब्ज डॉलर म्हणजे २८ टक्क्यांची घट झाली आहे.

जगातील पहिल्या शंभर श्रीमंत व्यक्तींच्या यादीत फक्त मुकेश अंबानी यांचा समावेश आहे तर गौतम अदानी, शिव नादर आणि उदय कोटक यांच्या संपत्तीत झालेल्या घसरणीमुळे जगातील 100 श्रीमंत लोकांच्या यादीमधून त्यांची नावे वगळली आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन महिन्यांत भारतीय शेअर बाजारामध्ये सुमारे 25 टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरातील कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे आणि यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साहही कमी झाला आहे. यामुळे भारतासह जगभरातील देशातील शेअर बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून गुंतवणुकीपेक्षा विक्रीचा जोर वाढला आहे.

शेअर बाजारात 25 टक्क्यांची घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 5.2 टक्क्यांनी घसरल्यामुळे भारताच्या अव्वल उद्योगपतींना मोठा धक्का बसला आहे, असे हुरुन रिपोर्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनुन रेहमान म्हणाले. त्याचमुळे मुकेश अंबानी यांची संपत्ती 28 टक्क्यांनी घट दिसून येत आहे. विशेषत: मुकेश अंबानी यांची संपत्ती कमी होण्यास त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतील तेल व्यवसायाचा मोठा वाटा आहे. बाजारात तेलाची मागणी कमी झाल्यामुळे त्यांच्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

टॅग्स :मुकेश अंबानीशिव नाडरशेअर बाजारकोरोना वायरस बातम्या