नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसविरोधात जगातील सर्व देशांनी लढाई सुरु केली आहे. अमेरिका, इटली या देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. भारतातही कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ४ हजारांवर पोहचली आहे तर १०० पेक्षा अधिक लोकांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी कंपनीतील हजारो कर्मचार्यांचं कौतुक केले जे मोबाईल, जीवनावश्यक वस्तू आणि इंधन यासारख्या सेवाही लॉकडाऊनदरम्यान सुरु ठेवल्या आहेत. अशा कठीण प्रसंगात देशासाठी काम करणाऱ्या या कर्मचार्यांना ‘फ्रंटलाइन वॉरियर्स’ अशा शब्दात अंबानी यांनी त्यांचा गौरव केला आहे. कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत रिलायन्स इंडस्ट्रीज भारताबरोबर उभी असल्याचं अंबानी यांनी सांगितले.
'कर्मचार्यांच्या कामाप्रती वचनबद्धतेचे कौतुक'
रिलायन्स समुहाच्या दोन लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ई-मेल संदेशात अंबानी म्हणाले की, आधुनिक इतिहासातील सर्वात भयानक आजाराशी लढा देण्याबाबत रिलायन्स कर्मचाऱ्यांनी दाखविलेली विलक्षण प्रतिबद्धता कौतुकास्पद आहे. जेव्हा देशातील बहुतेक १३० कोटी जनता लॉकडाऊनला सामोरे जात आहेत, तेव्हा टेलिकॉम क्षेत्रात जिओने ४० कोटी लोकांना अखंडित सेवेने जोडलं आहे, रिलायन्स रिटेल लाखो लोकांना आवश्यक वस्तू पोहचवत आहे असं ते म्हणाले.
रिलायन्स लाइफ सायन्सेस भारतात कोविड -१९ ची चाचणी क्षमता वाढविण्यात गुंतली आहे आणि सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलने अवघ्या १० दिवसात १०० बेडचं कोरोना हॉस्पिटल मुंबईत बनवले आहे. तसेच रिलायन्स लाइफ सायन्सेसने कोविड -१९ च्या चाचणीसाठी स्वतःचं किट विकसित केलं आहे, जी सुरुवातीला रिलायन्स कर्मचार्यांना उपलब्ध होईल आणि नंतर ती जनतेसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल असं मुकेश अंबानी यांनी सांगितले. त्याचसोबत आम्ही एकत्र या कठीण वेळेवर मात करू आणि रिलायन्स एक मोठे कुटुंब म्हणून उदयास येईल असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.
दरम्यान कोरोनामुळे रिलायन्स इंड्रस्टिजला मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या २ महिन्यात मुकेश अंबानी यांची संपत्ती २८ टक्क्यांनी घटली आहे. रिलायन्सच्या या नुकसानीत तेल कंपन्यांचा मोठा वाटा आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड प्रमाणात कमी झाल्या आहेत.