मुंबई - देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांच्या बचावासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. राज्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून शहरातील दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, काही अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत. त्यातच, उत्पादन कंपन्यांनाही हा आदेश लागू नाही. त्यामुळे कामगारांना कामावर हजर राहावे लागत आहेत. मुंबईसारख्या महनगरांमध्ये वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना कामावरच जावे लागते. मात्र, देशातील अनेक कंपन्यांनी पुढाकार घेत, कोरोना लॉक डाऊनच्या काळात कर्मचाऱ्यांना पगार कापणार नाही किंवा त्यांना कामावरुनही कमी करणार नाही, असे म्हटले आहे.
बजाज कंपनी मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बजाज यांनी पुढे येऊन कामगार, कर्मचाऱ्यांच्या पगारी कापणार नसल्याचे म्हटलंय. जर एकाही कामगाराला कमी केलं, अथवा त्यांची पगार कमी केली. तर मी एकही रुपया पगार न घेणार नाही, असे राजीव बजाज यांनी म्हटले. त्यासोबतच, आदित्य बिर्ला ग्रुप, वेदांत ग्रुप, एस्सार ग्रुप, यांनीही कामगारांची कपात अथवा कर्मचाऱ्यांची पगार कपात करणार नसल्याचे सांगितले आहे.
टाटा कंपनीचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनीही मार्च आणि एप्रिल महिन्यांपर्यंत कंपनीच्या कायम आणि कंत्राटी कामगार आणि कर्मचाऱ्यांना संपूर्ण पगार दिला जाईल, असे म्हटले आहे. कोरोना लॉक डाऊनच्या काळात क्वारंटाईनमुळे ते कामावर हजर राहू शकले नाहीत, तरीही या सर्व कामगारांना संपूर्ण वेतन दिले जाईल, असेही चंद्रशेखर यांनी म्हटलंय. तर श्री सिमेंट कंपनीचे एच.एम. बनगूर यांनीही कामगार आणि कर्मचाऱ्यांचा जीव महत्वाचा असल्याचं म्हटलं. सध्याच्या काळात उद्योगजगत अडचणीत आहे, पण सुरक्षा आणि लोकांचा जीव महत्वाचा असल्यचं म्हटलंय.
डी मॅरियट हॉटेल ग्रुपचे सीईओ अर्ने सोरेनसन यांनी आपली २ महिन्यांची पगार कोरोना लॉक डाऊनच्या मदतीसाठी देणार असल्याचे म्हटलंय. तसेच, पेटीम ग्रुपचे विजय शेखर शर्मा यांनीही अर्ने यांचा संदर्भ देत, मीही पुढील दोन महिन्यांची पगार घेणार नसून देशातील पेटीएम कार्यालयाती स्टाफच्या क्वारंटाईनसाठी हा पैसा वापरला जाईल, असे म्हटले आहे.