नवी दिल्ली : लॉकडाउननंतर रासायनिक कारखाने सुरू करताना सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्याचे आदेश राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणने (एनडीएमए) दिले आहेत. पहिला आठवडा हा केवळ ट्रायल घेण्यासाठीच वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
विशाखापट्टणम येथील कारखान्यामध्ये झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. लॉकडाउननंतर कारखाने सुरू करताना तेथील यंत्रसामग्री, यंत्रणा आणि कामगारांच्या सुरक्षिततेचे सर्व मापदंड पूर्णपणे पाळणे अत्यावश्यक असल्याचे या दिशादर्शक सूत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. कारखाने पुन्हा सुरू करताना पहिला आठवडा तेथे केवळ ट्रायल करावी, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. यामुळे तेथील सुरक्षाविषयक सर्व बाबी योग्य प्रकाराने काम करीत आहेत का ते समजून येईल आणि दुर्घटना घडण्याची शक्यता कमी राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अनेक सप्ताहांच्या लॉकडाउननंतर प्रकल्प पुन्हा सुरू करताना पाइपलाइन, व्हॉल्व्ह यांच्यामध्ये कोठे काही धोकादायक रसायने शिल्लक राहिलेली नाहीत, याची खात्री करून घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
हे आहेत काही महत्त्वाचे नियम
दोन वेळा कर्मचाऱ्यांचे तापमान मोजण्यात यावे.
फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन व्हावे.
कर्मचाऱ्यांसाठी मास्क, सॅनिटायझरची पुरेशी उपलब्धता असावी.
प्रत्येकी दोन ते तीन तासांनी सर्व टेबल, फर्निचर स्वच्छ पुसली जावीत.
आजारी असलेल्या कर्मचाºयांना कामावर येऊ दिले जाऊ नये.
कारखान्यामध्ये आलेल्या व तयार झालेल्या वस्तूंचे स्टर्लायझेशन करावे.
व्यवस्थापकीय विभागातील कर्मचाºयांची संख्या ३३ टक्के असावी.
कारखान्यातील आपत्कालीन यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करावी.
coronavirus: उद्योगधंदे सुरु करताना पहिल्या आठवड्यात केवळ ट्रायल घ्या
लॉकडाउननंतर कारखाने सुरू करताना तेथील यंत्रसामग्री, यंत्रणा आणि कामगारांच्या सुरक्षिततेचे सर्व मापदंड पूर्णपणे पाळणे अत्यावश्यक असल्याचे या दिशादर्शक सूत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 12:34 AM2020-05-11T00:34:23+5:302020-05-11T00:34:58+5:30