Join us

CoronaVirus : RBIच्या घोषणांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 2:44 PM

या टप्प्यांमुळे आमचे छोटे व्यावसायिक, एमएसएमई, शेतकरी आणि गरिबांना मदत मिळणार आहे. तसेच डब्ल्यूएमए मर्यादा वाढून सर्व राज्यांना मदत मिळणार आहे.

नवी दिल्लीः जगावर कोरोनाचं भयंकर संकट असून, रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरही विपरित परिणाम झाला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी पत्रकार परिषद घेऊन काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे अर्थसंकटाची तीव्रता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आर्थिक आघाडीवर केलेल्या उपायांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आरबीआयने केलेल्या घोषणांमुळे पतपुरवठा आणि तरलता वाढणार आहे. या टप्प्यांमुळे आमचे छोटे व्यावसायिक, एमएसएमई, शेतकरी आणि गरिबांना मदत मिळणार आहे. तसेच डब्ल्यूएमए मर्यादा वाढून सर्व राज्यांना मदत मिळणार आहे.तत्पूर्वी आरबीआयनं काही मोठे निर्णय घेतले आहेत. वित्तीय बाजारांमध्ये चढ-उतार येत असल्यानं कच्च्या तेलाचे दरही पडले आहेत. ओपेक देशांनी क्रूड उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली. या कपातीनंतर रिव्हर्स रेपो दर 4 टक्क्यांवरून घसरून 3.75 टक्क्यांवर आला आहे. रेपो दरात कोणताही बदल झालेला नाही. बँका अधिक कर्ज देऊ शकतील, त्यामुळे रिव्हर्स रेपो दर कमी करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नाबार्डला 25 हजार कोटी रुपये, सिडबीला 15 हजार कोटी रुपये आणि हाऊसिंग फायनान्स बँकेला 10 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. जेणेकरून एनबीएफसी, एमएसएमई, रिअल इस्टेटची रोखीची कमतरता दूर होण्यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 

टॅग्स :नरेंद्र मोदीकोरोना वायरस बातम्या