नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचं संकट वाढतच चाललं आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या लढ्यात मोदींच्या पीएम केअर्स फंडालाही अनेक उद्योगपतींनी कोट्यवधींची मदत दिलेली आहे. टाटा समूहानंही कोरोनाग्रस्तांसाठी १५०० कोटींच्या मदतीची घोषणा केल्यानं रतन टाटा चर्चेत आले होते. त्यावेळी रतन टाटांचं सोशल मीडियावर कौतुकही करण्यात आलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर रतन टाटांच्या नावे एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यावर आता खुद्द रतन टाटांनीच स्पष्टीकरण दिलेलं आहे.तज्ज्ञांचा हवाला देत रतन टाटांनी अनेक मुद्दे खोडून काढल्याचा या मेसेजमध्ये उल्लेख करण्यात आला असून, तो मजकूर असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण तसं काहीच रतन टाटांनी लिहिलेलं नसल्याचं आता समोर आलं आहे. अशा प्रकारचा कोणताही मजकूर मी लिहिलेला नाही, तसेच मी असं कुठेही सांगितलेलं नसल्याचाही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून खुलासा केला आहे.“या पोस्टमधील गोष्टी मी कधीच सांगितलेल्या अन् लिहिलेल्या नव्हत्या. व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर शेअर होणारी माहिती एकदा तपासून पाहा, अशी विनंती मी आपल्याला करतो. मला काही सांगायचं असल्यास मी ते माझ्या अधिकृत माध्यमांद्वारेच तुमच्यापर्यंत पोहोचवेन, तुम्ही सुरक्षित असल्याची अपेक्षा करतो. काळजी घ्या,” असं ट्विट रतन टाटांनी केलं आहे.
Coronavirus : तो मी नव्हेच; सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल मेसेजवर रतन टाटांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 4:02 PM