Join us

CoronaVirus : कोरोनाविरोधात सरकारी प्रयत्नांना आरबीआयची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 2:36 AM

CoronaVirus : कोरोनाने निर्माण केलेल्या आर्थिक नाकेबंदीवर मात करणे, आर्थिक वृद्धी पुन्हा प्रस्थापित करणे आणि देशातील वित्तीय स्थिरता टिकवून ठेवणे या उद्देशांना साधण्यासाठी हे धोरण आखले आहे.

- विनायक गोविलकर

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संपूर्ण जग कोविड-१९च्या धसक्याने अस्वस्थ आणि अशांत आहे. या विषाणूच्या प्रसार आणि मुक्कामाचा कालावधी याबाबत अनिश्चितता आहे. आर्थिक घडामोडींबाबत जग जणू ठप्प झाले आहे. परिस्थिती टिकत नाही, खंबीर माणसे आणि संस्था टिकतात. भारत ही गोष्ट जाणून पावले टाकत आहे. सरकार उपाय योजत आहे. अर्थमंत्र्यांनी काही पॅकेज जाहीर केले. सामान्यांचे जगणे सुकर व्हावे असा त्यात हेतू दिसतो. त्यालाच पूरक असे आरबीआयचेही धोरण जाहीर झाले.कोरोनाने निर्माण केलेल्या आर्थिक नाकेबंदीवर मात करणे, आर्थिक वृद्धी पुन्हा प्रस्थापित करणे आणि देशातील वित्तीय स्थिरता टिकवून ठेवणे या उद्देशांना साधण्यासाठी हे धोरण आखले आहे. वित्तीय बाजारपेठ आणि संस्था अशा परिस्थितीत सामान्यपणे आपला कारभार करू शकाव्यात म्हणून अर्थव्यवस्थेतील रोखता लक्षणीय प्रमाणात वाढविण्यावर भर दिला आहे. शिवाय बँकांना आरबीआयकडून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढविली, या उपायातून बाजारात २,७४,००० कोटी रुपयांची रोखता वाढेल.कर्जावरील व्याजदर कमी करून कर्ज स्वस्त करणे अशी योजना आहे. कर्ज हप्त्यांची फेड करण्यात सवलत दिली आहे. भारतात सध्या संचारबंदी असल्याने कर्जदारांच्या उत्पन्नाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सर्व प्रकारच्या कर्जांच्या तीन हप्त्यांच्या परतफेडीला मोरॅण्टोरियम देण्याची परवानगी दिली आहे. भारतातील बँकांना दि आॅफशोअर इंडियन रूपी डेरिव्हेटीव्ह मार्केटमध्ये व्यवहार करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.आरबीआयने बाजारातील ‘पत आणि पैसा’ वाढविण्यासाठीआणि तो कमी व्याजदराने उपलब्ध व्हावा म्हणून उत्तम धोरणमांडले आहे. कर्ज परत फेडीबाबत उदार भूमिका सुचविली आहे. या साºयाचा उपयोग कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यात हातभार लागण्यात होईल हे नक्की!(लेखक नाशकातील सनदी लेखापाल व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत)- कोव्हीड-१९ या रोगाने संपूर्ण जगात आर्थिक व्यवहारात जी प्रचंड घसरगुंडी झाली आहे त्याला भारतीय अर्थव्यवस्था अपवाद नाही. बाजारात गेल्या वर्षीपासून मंदी सदृश वातावरण होतेच ते आता अधिक गडद झाले आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरबीआयने योग्य पावले उचलली आहेत असे निश्चितपणे वाटते.- देशातील एकूण पैसा हा सरकारने छापलेले चलन आणि बँकांनी कर्जरूपाने निर्माण केलेला ‘पत पैसा’ यांचे मिळून होते. बाजारात पैसा असला तर जनतेकडे ‘क्रयशक्ती’ असेते, त्या क्रयशक्तीतून ‘मागणी’ निर्माण होते, मागणी पूर्ण करण्यासाठी ‘उत्पादन’ करावे लागते आणि उत्पादन करण्यासाठी उत्पादनाचे सर्व घटक यांना ‘रोजगार’ मिळतो. त्यातून त्यांना उत्पन्न मिळते आणि मागणी वाढते. हे बाजारपेठेचे चक्र आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक