Join us

Coronavirus: गुंतवणुकीसाठी स्थावर मालमत्तेलाच प्राधान्य; अ‍ॅनरॉकचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 2:21 AM

शेअर्स, सोने, बँकेतल्या मुदत ठेवींना दुय्यम स्थान

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे गृह खरेदीला घरघर लागण्याची चिन्हे असताना आजही गुंतवणुकीसाठी स्थावर मालमत्तेचा पर्यायच लोकांना सयुक्तिक वाटत असल्याची माहिती हाती आली आहे.

अ‍ॅनरॉक प्रॉपर्टीज्ने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, ४८ टक्के लोकांना मालमत्तेतली गुंतवणूक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी वाटत आहे. त्या तुलनेत शेअर बाजार (२५ टक्के), सोने (१८ टक्के) आणि बँकेतल्या मुदत ठेवी (९ टक्के) कमी आकर्षक वाटत असल्याचे हा अहवाल सांगतो.

२० ते २७ एप्रिल या कालावधीत देशातल्या १४ शहरांमध्ये वास्तव्याला असलेल्या २४ ते ६७ वर्षे वयोगटातील सुमारे १,९१० लोकांशी चर्चा करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात ६६ टक्के पुरुष आणि ३४ टक्के महिलांचा समावेश आहे. सर्वेक्षण केलेल्यांपैकी ५४ टक्के लोकांना मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचे वाटत आहे. तर, ११ टक्के लोक त्यावर सहमत नाही. ८९ टक्के लोकांना ४५ लाख ते दीड कोटी रुपये किंमतीपर्यंतच्या घरांमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा आहे.

गुंतवणूकदारांना मुंबई महानगर क्षेत्र, बंगळुरू आणि हैदराबाद येथील मालमत्तांमध्ये गुंतवणुकीचा ओढा असल्याचेही दिसत आहे. विकासकांकडून दिल्या जाणाऱ्या सवलती आणि आकर्षक आॅफर्स, कमी किंमतीतल्या घरांची उपलब्धता, स्वत:चे घर असल्याने निर्माण होणारी सुरक्षिततेची भावना हे गृह खरेदीकडे लोकांचा ओघ वाढविणारे प्रमुख घटक असल्याची माहिती अ‍ॅनरॉकचे चेअरमन अनूज पुरी यांनी दिली. तसेच, कोरोनाच्या संकटानंतर अतिधोकादाक क्षेत्रातील गुंतवणूक करण्याऐवजी स्थावर मालमत्तेत विशेषत: घरांमध्ये गुंतवणूक करण्याचा ओढा वाढेल. तसेच, यापुढे अनेक जण भाड्याच्या घराऐवजी स्वत:च्या मालकीच्या घरात राहणे पसंत करतील, असेही त्यांचे मत आहे.५६ टक्के ग्राहकांचा विचार बदललाकोरोना दाखल होण्यापूर्वी गृहखरेदीचा विचार करणाºया संभाव्य ग्राहकांपैकी ५६ टक्के ग्राहकांनी आपला विचार बदलला असून, ४४ टक्के ग्राहक आजही आपल्या निर्णयांवर ठाम आहेत. त्यांचा ओढा ४५ ते ९० लाख रुपये किंमतीच्या परवडणाºया घरांकडे आहे. तर, कोरोना होण्यापूर्वी मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांपैकी ८४ टक्के ग्राहक हे आपल्या निर्णयावर आजही समाधानी आहेत.

टॅग्स :गुंतवणूककोरोना वायरस बातम्या