मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अनेक स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे महिंद्रा आणि टाटासारखे उद्योग समूहसुद्धा सरकारच्या मदतीसाठी पुढे सरसावल्याचं पाहायला मिळत आहे. आनंद महिंद्रांच्या पाठोपाठ रिलायन्सनंही कोरोनाग्रस्तांसाठी अमूल्य योगदान दिलं आहे. रिलायन्स समूहानं दोन आठवड्यांमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी 100 बेड्सची क्षमता असलेलं रुग्णालय उभारलं आहे. तसेच हे कोरोनाग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या रुग्णालय सर्व सोयीसुविधांनीयुक्त आहे. या रुग्णालयात क्वारंटाईन सुविधा, कोरोना चाचणीच्या किट्सची सुविधा असून, रिलायन्सचा प्रतिदिन 10 लाख मास्कही तयार करण्याचाही मानस आहे. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय मदत, जिओ प्लॅटफॉर्मचा वापर करून आरोग्य सेवा आणि सर्व आपत्कालीन सेवा वाहनांना मोफत इंधन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही कंपनीनं सांगितलं आहे. रिलायन्सनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीला पाच कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं आहे.परदेशातून आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईनमध्ये ठेवलं जातं आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे रुग्णालय सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनने विशेष वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचीही तयारी दाखवली आहे. यामुळे विलगीकरणासाठी आवश्यक असलेल्या सुविधा तातडीने मिळतील आणि रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातील, असं रिलायन्सकडून सांगण्यात आलं आहे. रिलायन्स लाईफ सायन्सकडून करोनाची चाचणीसाठी आवश्यक किट्स आणि साहित्य आयात केली जात आहेत. रिलायन्सचे डॉक्टर आणि संशोधक ओव्हर टाइम करुन या जीवघेण्या व्हायरसविरोधात लढा देत आहेत, अशी माहिती कंपनीने दिली. कोरोनाच्या विरुद्धच्या सामूहिक लढाईत आरआयएलने आपल्या कर्तव्याचे पालन करत 24x7 देशाच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे सिद्ध केले आहे. आरआयएलने यापूर्वीच कोरोनाविरुद्धच्या लढ्यात व्यापक, निर्णायक भूमिका घेणार असल्याचं सांगितलं होतं. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता त्याला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असंसुद्धा कंपनीनं निवेदनात म्हटलं आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीने सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनने मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात 100 बेड्सची क्षमता असलेलं केंद्र सुरू केलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर इथे उपचार केले जातील. या केंद्रावर निगेटिव्ह प्रेशर रूम तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कोरोनाची बाधा होणार नाही आणि बाधितांची संख्या रोखण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कंपनीनेच पत्रकाद्वारे दिली आहे. सर्व बेड्स हे आवश्यक साहित्यांसह उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर्स, पेसमेकर्स, डायलॅसिस मशिन आणि पेशंट मॉनिटरिंग साहित्यही उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
Coronavirus: मुकेश अंबानी मदतीला धावले; अवघ्या दोन आठवड्यांत कोरोनाबाधितांसाठी रुग्णालय उभारले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:49 PM