सध्या देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप Swiggy नं आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. मे महिन्यात त्यांचा कर्मचारी वर्ग आठवड्यातून केवळ चारच दिवस काम करेल अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. तसंच आठवड्यातून कोणते चार दिवस करायचं आहे हा ठरवण्याचा अधिकारही कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिला आहे. कंपनीचे एचआर प्रमुख गिरीश मेनन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. "Swiggy च्या कर्मचाऱ्यांनी खुप मेहनत केली आहे आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो. देशात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा आठवडा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्हाला माहिती आहे आपण एक कोविड टास्क फोर्स तयार केली आहे. आपण यात आणखी लोकांना एकत्र घेऊन चांगलं काम करू शकतो. ब्रेकच्या दिवसांत तुम्हाला कोविड टास्क फोर्समध्ये सेवा देण्याची इच्छा असेल तर तुमचं स्वागत आहे," असं मेनन यांनी आपल्या ईमेलमध्ये लिहिलं आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणँ आपली जबाबदारी आहे. शारीरिक आणि मानसिक रुपानं आपल्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेण्याअंतर्गत हा निर्णय घेतल्याचं Swiggy नं म्हटलं आहे.
संकटकाळात मदतSwiggy नं संकट काळात सपोर्ट मशिनरी आणि आपात्कालिन सपोर्ट सिस्टमही तयार केलं आहे. संकटकाळात ही स्विगीच्या कर्मचाऱ्यांची मदतही करू शकते. यासाठी कंपनीनं Swiggy शिल्ड अॅप तयार केलं आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या सपोर्टसाठी एक हॉटलाईन सुरु केली आहे. कोविड १० सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या मदतीनं आयसीयू बेड्स, प्लाझ्मा आणि ऑक्सिजन सिलेंडरसह अॅम्ब्युलन्स सपोर्टसाठीही मदत घेता येऊ शकते.
उपचाराचा खर्च उचलणारकंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल कन्सल्टेशन आणि मेडिकल सपोर्टची सुविधाही सुरु केली आहे. यामध्ये स्विगीच्या कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशन आणि क्वारंटाईन केअरसारख्या सुविधा दिल्या जातात. तसंच उपचारासाठी येणारा खर्च रिअंबर्स करण्याचादेखील पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा त्यांच्या कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासल्यास त्याचा खर्चही कंपनी उचलणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.