नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे स्थगित केलेली आंतरदेशीय विमानसेवा केंद्र सरकारने पुन्हा सुरू केली असली, तरी अपेक्षित व्यवसाय होत नसल्याने कंपन्या हताश आहेत. असाच प्रचंड तोटा होत राहिल्यास काही कंपन्या बंद पडू शकतात, असा इशारा या क्षेत्रातील सल्लागार कंपनी सीएपीएने दिला आहे.संस्थेने म्हटले आहे की, अनेक विमानांमध्ये निम्मेच प्रवासी असतात. प्रवासी संख्या वाढण्याची सध्या शक्यता नाही. यामुळे आंतरदेशीय विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना तीन ते साडेतीन अब्ज डॉलरचा तोटा सहन करावा लागेल. हा तोटा २.५ अब्ज डॉलरचा असेल, असा आधीचा अंदाज होता. विमान कंपन्यांना दुसºया तिमाहीत हा मोठा तोटा सोसावा लागेल. त्यातून काही कंपन्या बंद पडण्याची शक्यता आहे. आंतरदेशीय सेवा देणाºया कंपन्यांना आर्थिक डोलारा सावरण्यास मदत न मिळाल्यास फक्त दोन ते तीनच कंपन्या अस्तित्व टिकवून ठेवतील.एअर एशिया इंडिया या विमान कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, केंद्राचा आंतरदेशीय विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय योग्य होता. पण तिकिटांचे दर बाजारपेठेतील घडामोडींनुसार निश्चित करण्यात आले पाहिजेत.दररोज सत्तर हजार जणांनी केला प्रवासआंतरदेशीय विमानसेवा २५ मेपासून सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत विमानांची फक्त ५५ टक्के आसनांची तिकिटे विकली गेली. विमानात ३० टक्के प्रवासी असले, तरी उड्डाण करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. गेल्या महिन्यात दररोज सरासरी सत्तर हजार प्रवाशांनी आंतरदेशीय विमानांतून प्रवास केला. गेल्या वर्षी जून महिन्यात आंतरदेशीय विमानांतून दररोज सरासरी ४ लाख लोक प्रवास करत होते.
coronavirus: काही आंतरदेशीय विमान कंपन्या बंद पडण्याची शक्यता, प्रचंड तोटा; अनेक विमानांत निम्मेच प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 5:26 AM