Join us

coronavirus : साथीच्या रोगाचा शेअर बाजार पहिलाच ऐतिहासिक बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 3:36 AM

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्व प्रमुख देशांमधील शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत घसरण होत आहे. भारतीय शेअर बाजाराने तर या दोन दिवसांत त्याचे रौद्र रुप दाखवले.

- प्रा. नंदकुमार काकिर्डेपुणे : गेल्या आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने अभूतपूर्व परिस्थिती अनुभवली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील सर्व प्रमुख देशांमधील शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत घसरण होत आहे. भारतीय शेअर बाजाराने तर या दोन दिवसांत त्याचे रौद्र रुप दाखवले.गुरुवारच्या (दि. १२) सत्रात मुंबई शेअर निर्देशांक २९१९.२६ अंशांनी किंंवा ८.१८ टक्के घसरून ३२ हजार ७७८.१४ अंशपातळीवर, तर निफ्टी ८.३० टक्के घसरून ९ हजार ५९०.१५ अंशपातळीवर स्थिरावलेला. त्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनाला जागतिक साथीचा आजार म्हणून जाहीर केले. त्याचा जगभरातील शेअर बाजरांवर प्रतिकूल परिणाम झाला. त्यातच अमेरिकेने युरोपातील व अन्य देशांमधील पर्यटकांवर बंदी घातल्याने व भारतानेही सर्व देशांमधील पर्यटकांवर बंधने जाहीर केल्याने या परिस्थितीत आणखी प्रतिकूलतेची भर पडली.शुक्रवारी (दि. १३) सप्ताहाची अखेर होती. त्यातच कोरोनाचा वेगाने प्रसार होत राहिल्याच्या बातम्या येत होत्या. परिणामी, गुरुवारपेक्षा जास्त वेगाने मुंबई शेअर निर्देशांक व निफ्टी कोसळला. बाजार सुरू झाल्यानंतर १०.०५ मिनिटांनी व्यवहार ‘लोअर सर्किट’ लागल्याने बंद ठेवावे लागले. मात्र, पुन्हा १०.२५ मिनिटांनी व्यवहार सुरू झाले. मात्र, भारतीय वित्त संस्था, गुंतवणूकदारांनी मंदीवाल्यांवर मात केली. त्यांनी खालच्या पातळीवर गेलेल्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सची तडाखेबंद खरेदी केली. यामुळे एकाच सत्रात सकाळी अभूतपूर्व घसरण झालेला शेअर बाजार अखेरच्या दोनतीन तासांमध्ये जोरदार उसळून वर आला. निर्देशांकात १३२५.३४ अंशांची सुधारणा होऊन तो ३४ हजार १०३.४८ अंशपातळीवर बंद झाला. निफ्टीतही ३६५.०५ अंशांची सुधारणा झाली. निफ्टी ९ हजार ९५५.२० अंशपातळीवर बंद झाला.या दोन सत्रांमध्ये शेअर बाजारांवर झालेली कंपन्यांच्या भावपातळीची वध घट व दोन्ही प्रमुख निर्देशांकांमधील चढ उतार आजवरच्या इतिहासात पाहायला मिळाला नाही. एकाच क्षणात कोट्यवधी रुपयांच्या समभागांच्या मूल्याची माती व दुसऱ्या क्षणात उसळी, असे अनाकलनीय चित्र गुरुवार व शुक्रवारच्या सत्रात दिसले. मात्र, याला जागतिक पातळीवरील अनेक घडामोडी, कोरोनाचा प्रादुर्भाव कारणीभूत होता.मात्र, भारतीय शेअर बाजारांचा यापूर्वीचा इतिहास पाहता अशा प्रकारची अभूतपूर्व घसरण अनेकवेळा गुंतवणूकदारांनी अनुभवलेली आहे. मात्र, प्रत्येक वेळची कारणे वेगवेगळी होती. गेल्या दहा-बारा वर्षांचा आढावा घेता २१ व २२ जानेवारी २००८ या दोन सत्रांत मुंबई शेअर निर्देशाक अनुक्रमे २२७२ अंश व २०६२ अंशांनी घसरला होता. त्याला जागतिक आर्थिक मंदीची पार्श्वभूमी होती. त्यापूर्वी २९ सप्टेंबर १९९७ रोजी निर्देशांक १९६१.२१अंशांनी खाली कोसळला होता. तर, १७ आॅक्टोबर २००७ रोजी १७४३.९६ अंशांची घसरण झाली होती. त्यानंतर २४ आॅगस्ट २०१५ रोजी निर्देशांक १७४१.३५ अंशांनी खाली आला. या पूर्वी अनेक सत्रांमध्ये हजार अंशांची घसरण झाली होती. मात्र, १२ व १३ मार्च रोजी झालेली घसरण आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी घसरण ठरली आहे.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांककोरोना