मुंबई - देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टकडून नेहमीच योगदान दिलं जाते. गेल्या ७० वर्षातील सर्वात मोठं संकट म्हणून सध्या कोरोना आणि देशातील लॉकडाऊनकडे पाहिलं जातंय. या संकटासाठी अनेक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था पुढाकार घेत आहेत. आपल्यापरीने प्रत्येक संस्था, व्यक्ती कोरोनाच्या लढाईत मदत करत आहे. कुणी, व्यक्तिश:, कुणी लहान-सहान गरजूंना अन्न पुरवतही आपलं योगदान देत आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी शिर्डीच्या साई मंदिर ट्रस्टकडून ५० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर, मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टने ५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. यासोबत, देशातील अनेक उद्योजक कामगारांच्या वेतनात कपात करणार नसल्याचे सांगत, या लढाईत आपले योगदान देत आहे. आत, टाटा ग्रुपने कोरोनाच्या लढाईत मोठं योगदान दिलं आहे. कोरोनाच्या लढाईसाठी टाटा ग्रुपकडून ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
टाटा कंपनी आणि ग्रुप्सने यापूर्वीही देशावरील संकटात आपलं योगदान दिलं आहे. आताही, देशसेवेत योगदान देण्याची हीच ती वेळ आहे. सध्याच्या काळाजी गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच ती वेळ असल्याचे टाटा यांनी सांगितले आहे. टाटा समूहाकडून वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या खरेदींसाठी ५०० कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे पत्र रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं आहे.
सद्यस्थितीत देशाला आणि जगाला कोरोना व्हायरसने घेरले असून आपण कृती करण्याची हीच ती वेळ आहे. कोरोनाविरुद्ध मानवजातीची रेस सुरु आहे. त्यामुळे, या रेसमध्ये सहभागी होत, टाटा ग्रुपकडून कोरोनाच्या लढाईसाठी वैद्यकीय साहित अन् अत्यावश्यक गरजांसाठी ५०० कोटी रुपये जाहीर करत असल्याचे सांगण्यात आले. हीच ती वेळ असे म्हणत... एकप्रकारे इतरही उद्योजकांना टाटा यांनी देशसेवत सहभागी होण्याचं अप्रत्यक्षपणे सांगतिलं आहे. दरम्यान, टाटा कंपनीने यापूर्वीही कंपनीतील एकाही कामगारांचा पगार कापला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे कंत्राटी कामगारांनाही पूर्ण वेतन मिळेल, अशी खात्री कंपनीने दिली आहे.