मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनचा विपरित परिणाम देशातील औद्योगिक क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळेच देशातील उद्योग क्षेत्राचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी लॉकडाऊनमधून हळूहळू सवलत देण्यात येत आहे. तरीही देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून, देशातील बेरोजगारीचा दर २३.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) ने जाहीर केलेल्या आकडेवारीमधून ही माहिती समोर आली आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे औद्योगिक क्षेत्राच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. दरम्यान, बेरोजगारीच्या दरामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एप्रिलमध्यी २३.५२ टक्क्यांच्या तुलनेत मे महिन्यामध्ये बेरोजगारीच्या दरामध्ये किंचीतशी घट झाली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या चार टप्प्यांनंतर आता देशात व्यवहारांमध्ये हळूहळू सवलती देण्यास सुरुवात झाली असून, याचा उल्लेख अनलॉक-१ असाही त्याचा उल्लेख करण्यात येत आहे. मात्र मे महिन्यात लॉकडाऊमध्ये ज्या काही सवलती देण्यात आल्या होत्या. त्याचा फारसा फायदा झाल्याचे दिसून आले नाही. तसेच सरकारी आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यामध्ये कोअर सेक्टरमधील इंडस्ट्रीच्या उत्पादनामध्ये ३८.१ टक्क्यांनी घट झाली आहे.
सीएमआयईने दिलेल्या आकडेवारीनुसान कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे शहरी भागांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक जास्त होता. त्याचे कारण म्हणजे शहरी भागात रेड झोन जास्त आहेत. देशात लॉकडाऊन जाहीर झाले तेव्हाच यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता. दरम्यान, लॉतडाऊनमुळे देशात सुमारे १२ कोटी लोक बेरोजगार झाल्याची आकडेवारी सीएमआयएने यापूर्वी प्रसिद्ध केली होती.
दरम्यान, लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि छोट्या व्यावसायिकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये फेरिवाले, फुटपाथवरील विक्रेते, बांधकाम क्षेत्रातील मजूर आणि रिक्षाचालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असेही सीएमआयईने म्हटले आहे.