बंगळुरु : देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात मित्र, आप्तेष्ट यांच्याशी संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंग, झूम आणि इतर अॅप्लिकेशन्सचा वापर वाढला आहे. या अॅप्सच्या वापराचे प्रमाण तब्बल १७ पटींपर्यंत वाढले असून, वापरकर्त्यांच्या संख्येतदेखील अडीच पटीहून अधिक वाढ झाली आहे. त्याचबरोबर समूहाने एकमेकांशी व्हिडिओद्वारे संवाद साधण्याच्या प्रमाणातही वाढ नोंदविण्यात आली आहे.
देशात व्हॉट्सअॅपचे ४० कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. लॉकडाऊनच्या काळात व्हॉट्सअॅप मेसेज, व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलमध्ये वाढ झाल्याचे व्हॉट्सअॅपने सांगितले आहे. अमेरिकन ‘झूम’ अॅपचा वापर शाळाबाह्य वर्ग भरविण्यासाठी, व्यावसायिक कामांसाठी अथवा मित्रमंडळींमध्ये संपर्कासाठी अधिक केला जातो. झूममध्ये तीच सुविधा आहे. अनेकजण सुरक्षिततेचे नियम पाळत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन कॉन्फरन्स
झूमवरुन मासिक व्हिडीओ कॉलिंगचे प्रमाण १७ पट वाढले आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये दरमहा ५ लाख व्हिडिओ कॉल केले जात होते. त्यात मार्च महिन्यात तब्बल ८७ लाखांपर्यंत वाढ झाली आहे.
भारतीय कंपन्यादेखील अशा पद्धतीच्या सेवा पुरवत आहेत. येथील ‘एअरमीट’ अॅपच्या माध्यमातूनही ऑनलाईन कॉन्फरन्स सेवा दिली जाते. पूर्वी त्यांचे ग्राहक दिवसाला सरासरी ५०० मिनिटे या सेवेचा वापर करीत होते. त्यात आता ५ लाख मिनिटांपर्यंत वाढ झाली आहे.
झोहो ही भारतातील अशी सेवा देणारी सर्वांत मोठी सॉफ्टवेअर कंपनी मानली जाते. त्यांच्या मते मार्च महिन्यातील दररोजच्या वापरात सातशे टक्क्यांनी वाढ झाली असून, एप्रिल महिन्यात १४४० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. वापरकर्त्यांची संख्यादेखील २४० टक्क्यांनी वाढली आहे.
CoronaVirus: लॉकडाऊनचा परिणाम; व्हिडिओ कॉल्सचा वापर वाढला सतरापटीने !
समूहाने एकमेकांशी व्हिडिओद्वारे संवाद साधण्याच्या प्रमाणातही वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 01:57 AM2020-04-23T01:57:27+5:302020-04-23T01:58:04+5:30