नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगचे नियम लागू आहेत. त्यामुळे देशातील बहुतांश कॉर्पोरेट आणि इतर कार्यालये बंद आहेत. तर काही अंशत: सुरू आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी सध्या वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करत आहेत. मात्र गेल्या चार, साडे-चार महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्क फ्रॉम होम चा आता अनेक कर्मचाऱ्यांना कंटाळा येऊ लागला असून, अनेक कर्मचाऱ्यांना ऑफीसची आठवण येऊ लागली आहे. एका सर्वेक्षणानुसार भारतातील तब्बल ८२ टक्के कर्मचाऱ्यांना ऑफीसची आठवण येत आहे.
रियल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म जेएलएलने केलेल्या सर्वेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना घरामधून काम करण्याचे मिळालेले स्वातंत्र्य चांगले वाटत आहे. मात्र ऑफीसमधील भेटीगाठी, गप्पागोष्टी यांची आठवण कर्मचाऱ्यांना येत आहे. इतकेच नाही तर प्रोफेशनल वातावरणात काम करण्यात मिळणाऱ्या सवलतींची आठवण येत आहे.
या सर्वेनुसार ज्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यातील सुमारे ६६ टक्के कर्मचारी कोरोनामुळे घरातूनच काम करत आहेत. या सर्वेमध्ये आशिया पॅसिफिकमधील पाच देशांमधील १ हजार ५०० कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. यामधील ६१ टक्के कर्मचाऱ्यांनी ऑफिसला मिस करत आहेत. भारतात हेच प्रमाण ८१ टक्के आहे. दरम्यान, भविष्यात कामासाठी घर आणि ऑफिसमधील फ्लेक्सिबल व्यवस्था आवडेल, असे संकेतही कर्मचाऱ्यांनी दिले.
आशिया-पॅसिफिकमधील अन्य वयोगटातील व्यक्तींपेक्षा तरुण वर्गाला ऑफिसची अधिक आठवण येत आहे. सर्वेमध्ये सहभागी झालेल्या ६६ टक्के कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांशी चर्चा करणे, व्यावसायिक वातावरणात काम करणे आणि काम करण्याची जागा आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान ८१ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, वर्क फ्रॉम होममुळे आपण तांत्रिकदृष्ट्या जास्त सक्षम झालो आहोत. तसेच ५२ टक्के लोकांना वर्क फ्रॉम होममुळे प्रॉडक्टिव्हिटी वाढली आहे, असे सांगितले.
दरम्यान, भारतातील तब्बल ८६ टक्के कर्मचारी आपल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याबाबत निश्चिंत आहेत. तर संपूर्ण आशिया पॅसिफिकचा विचार केल्यास हे प्रमाण केवळ ६५ टक्के आहे.