नवी दिल्ली – चीन, अमेरिकासह संपूर्ण जगावर पसरलेल्या कोरोना संकटामुळे आर्थिक व्यवस्था डबघाईला आली आहे. जगात साडेसात लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३७ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देशात लॉकडाऊन केल्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.
अर्थव्यवस्थेत आलेल्या डबघाईमुळे लाखो लोक गरीब होतील असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे. सोमवारी जागतिक बँकेने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही शक्यता वर्तवली आहे. रिपोर्टमध्ये नमूद केलं आहे की, यावर्षीचा जीडीपी ग्रोथ २.१ टक्के राहू शकतो. २०१९ मध्ये हा रेट ५.८ टक्के होता. चीनचा विकास दरही मागील वर्षीच्या तुलनेत ६.१ टक्क्यावरुन २.३ टक्क्यांपर्यंत घसरु शकतो.
बँकेच्या अहवालानुसार १ कोटीपेक्षा अधिक लोक गरिबीच्या रेषेखाली येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या पूर्वी वर्तवलेल्या अंदाजाच्या विरुद्ध हा अंदाज आहे. समतोल विकास दर राहिला तर साडेतीन कोटी लोक दारिद्र रेषेवर येतील असं सांगण्यात आलं होतं.
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगावर आर्थिक संकटही उभं केलं आहे. या व्हायरसमुळे आणखी किती लोकांचा मृत्यू होईल याची कल्पनाही करु शकत नाही. मागील २४ तासात स्पेनमध्ये ९१३ मृतांसह ७००० मृत्यू, इटली ११ हजार आणि फ्रान्समध्ये ३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक महामारीचा परिणाम कच्च्या तेलावरही होत आहे. आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती १७ वर्षापेक्षा खालच्या स्तरावर आल्या आहेत. अमेरिकेत वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट ५.३ टक्क्यावरुन २० डॉलर प्रति बॅरल आणि आंतरराष्ट्रीय मानक ६.५ टक्क्यावरुन २३ डॉलरपर्यंत पोहचलं आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. त्यामुळे प्रवासावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत प्रचंड घट झाली असून मागणीही कमी झाली आहे.