नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या परिणामी यंदा मार्च महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनात १६.७ टक्क्यांची घट झाली आहे. लॉकडाऊनचा फटका विशेषकरून खाण, उत्पादन व विद्युतनिर्मिती क्षेत्राला बसला आहे.
यासंदर्भातील आकडेवारी केंद्र सरकारने मंगळवारी जाहीर केली. २५ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाले. नॅशनल स्टॅटिस्टिकल आॅफिस (एनएसओ)च्या आकडेवारीनुसार यावर्षी उत्पादन क्षेत्रात मार्चमध्ये आयआयपी २०.६ टक्क्यांनी कमी झाला. गेल्या वर्षी याच महिन्यात आयआयपी ३.१ टक्क्यांनी वाढला होता. विद्युतनिर्मिती क्षेत्रामध्ये यंदा मार्च महिन्यात ६.८ टक्क्यांनी उत्पादन घटले. मात्र वीज उत्पादन गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात २.२ टक्क्यांनी वाढले होते. खाणक्षेत्रामध्ये मार्च महिन्याच्या सुरु वातीला ०.८ टक्के वाढ झाली होती; पण नंतर त्यात घसरण झाली. लॉकडाऊनमुळे देशातील बहुतांश उद्योगधंदे बंद असून, त्यामुळे अनेकांचा रोजगारही बुडाला आहे. कोरोनाच्या साथीचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ नये यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याचे प्रत्येक कारखाना तसेच कार्यालयात बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियम पाळून ग्रीन झोनमध्ये काही ठिकाणी कारखाने सुरू झाले आहेत. मात्र सर्वच कारखाने, उद्योग पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानेच पार पाडावी लागेल.
मजुरांचाही तुटवडा जाणवण्याची शक्यता
लॉकडाऊन संपूर्णपणे कधी मागे घेण्यात येईल याची निश्चित तारीख सांगणे शक्य नसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे लॉकडाऊन सुरू असेपर्यंत देशातील उत्पादनात घट होणार हे ओघाने आलेच. त्याशिवाय सध्या स्थलांतरित मजूर गावी परतत असून, त्यांचाही तुटवडा लॉकडाऊन असेपर्यंत व नंतर काही महिने जाणवणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
coronavirus: लॉकडाऊनचा परिणाम, औद्योगिक उत्पादनात १६.७ टक्के घट; खाण, वीज, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांना मोठा फटका
२५ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाले. नॅशनल स्टॅटिस्टिकल आॅफिस (एनएसओ)च्या आकडेवारीनुसार यावर्षी उत्पादन क्षेत्रात मार्चमध्ये आयआयपी २०.६ टक्क्यांनी कमी झाला. गेल्या वर्षी याच महिन्यात आयआयपी ३.१ टक्क्यांनी वाढला होता. विद्युतनिर्मिती क्षेत्रामध्ये यंदा मार्च महिन्यात ६.८ टक्क्यांनी उत्पादन घटले.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 03:58 AM2020-05-13T03:58:39+5:302020-05-13T03:58:46+5:30