संयुक्त राष्ट्र : कोरोना विषाणूच्या हल्ल्याची दुसरी लाट आल्यास चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामहीत जगभरातील ३४० दशलक्ष पूर्णवेळ रोजगार कमी होण्याची भीती आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने वर्तविली आहे. यामुळे जगभरातील कामाच्या तासांचा विचार करता ११.९ टक्के कामाचे तास कमी होण्याची भीती आहे.
जगभरात कोविड-१९ या साथीने झालेल्या हानीबाबत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जाहीर केलेल्या पाचव्या अहवालात वरील भीती वर्तविण्यात आली आहे. चालू वर्षातील दुसºया तिमाहीत कोविडच्या साथीमुळे जगभरातील कामाच्या तासांचे सुमारे १४ टक्के नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. हे नुकसान ४०० दशलक्ष पूर्णवेळ रोजगाराएवढे असल्याचे संघटनेने म्हटले आहे. सर्व व्यवस्था पुन्हा पूर्व पदावर आणली तरी या साथीमुळे झालेले नुकसान दुसºया सहामहीमध्ये भरून निघण्याची शक्यता कमी असल्याचे मतही या अहवालामध्ये व्यक्त केले आहे.
कोविड-१९च्या साथीमुळे जगभरात होणारे कामाच्या तासांचे नुकसान हे आधी करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा बरेच जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सन २०१९च्या शेवटच्या तिमाहीत असलेल्या रोजगाराच्या स्थितीपेक्षा कोविड १९च्या साथीमुळे ४.९ टक्के कामाचे तास कमी झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या हल्ल्याची दुसरी लाट चालू वर्षाच्या दुसºया सहामाहीत येण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा काही काळ कामकाजावर बंधने येण्याची शक्यता असून अर्थव्यवस्थेची गती पुन्हा कमी होऊ शकेल, अशी भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे कामाचे तास कमी होऊन रोजगार जाण्याची भीती असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. सध्या कामकाजावरील बंधने कमी केल्यावर लगेचच विविध ठिकाणी कामकाज सुरू झाले. त्याचप्रमाणे विविध वस्तूंची मागणी वाढावयास लागल्याने अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत असली तरी अद्यापही स्थिती कोविड-१९च्या साथीपूर्वी असलेल्या जागी येऊ शकलेली नाही.
पुरुषांपेक्षा महिलांना अधिक फटका
या साथीमुळे काम गमविण्याचा फटका महिलांना मोठ्या प्रमाणात बसल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आलेली लिंग समानता पुन्हा असामनतेमध्ये बदलताना दिसत आहे. निवास व्यवस्था, अन्नपदार्थांची निर्मिती, विक्री आणि उत्पादन ही महिला कामगारप्रधान असलेली क्षेत्रे या साथीमध्ये सर्वाधिक बाधित झाली असून, त्याचा फटका महिलांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. जगभरामध्ये या चार क्षेत्रांमध्ये ५१० दशलक्ष (सुमारे ४० टक्के) महिला काम करीत आहेत. येथील पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या त्यामानाने कमी (३६.६ टक्के) आहे.
घरगुती काम, आरोग्य आणि सामाजिक सुविधा या क्षेत्रांमध्येही महिलांची संख्या लक्षणीय असून, साथीमुळे या महिलांना मोठा धोका निर्माण झालेला दिसून आला. येथे काम करणाºया महिलांना विषाणू संसर्गाची शक्यता मोठी असून, त्यामुळे त्यांना नोकरी अथवा रोजगार गमवावा लागला आहे. साथीपूर्वी कोणत्याही मोबदल्याशिवाय महिलांकडून घेतली जाणारी काळजी आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे महिलांच्या उत्पन्नामध्ये घट होत असल्याचे अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
बुडालेल्या कामात अमेरिका अव्वल
या अहवालामध्ये देण्यात आलेल्या विभागवार नोंदींमध्ये वर्षाच्या दुसºया तिमाहीमध्ये कोविड साथीचा अमेरिकेला सर्वाधिक फटका बसल्याचे दिसत आहे. विविध विभागांना झालेला तोटा याप्रमाणे अमेरिका (१८.३ टक्के), युरोप व मध्य आशिया (१३.९ टक्के), आशिया व प्रशांत क्षेत्र (१३.५ टक्के), अरब देश (१३.२ टक्के) आणि आफ्रिका (१२.१ टक्के).