नवी दिल्ली - कोरोनाचा नव्हा व्हेरिअंट ओमिक्रॉन (Omicron) देशात वेगाने पसरत आहे. पण, या महामारी विरोधातील लढाईत आता एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण सिरिंज (syringes) बनविणारी देशातील सर्वात मोठी कंपनी हिंदुस्तान सिरिंज आणि मेडिकल डिव्हाईसेसने (HMD) आपले प्लांट बंद केले आहेत. हरियाणा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानंतर, कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात सिरिंज आणि सुयांचा (needles) मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. देशातील लोकांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे.
देशातील एकूण सिरिंज मागणीपैकी दोन तृतीयांश सिरिंजचे उत्पादन HMD करते. अशा स्थितीत कंपनीचे प्लांट बंद पडल्याने देशात सिरिंजचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. कंपनीचे दिल्लीला लागून असलेल्या फरीदाबादमध्ये 11 एकरांचे कॉम्प्लेक्स आहे. यात 4 उत्पादन युनिट्स आहेत. यांपैकी कंपनीने 3 युनिट बंद केले आहेत. यात कंपनीच्या मुख्य प्लांटचाही समावेश आहे. हरियाणा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
का बंद करण्यात आले प्लांट - कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव नाथ यांनी ET सोबत बोलताना सांगितले की, शुक्रवारी दुपारनंतर आम्ही आमच्या कॉम्पलेक्समध्ये प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की, कंपनीकडे दोन दिवसांपेक्षा जास्त बफर स्टॉक नाही. आम्ही रोज 1.2 कोटी सिरिंज तयार करतो परंतु सोमवारपासून हे उपलब्ध होणार नाही. सध्या एका प्लांटमध्ये 40 लाख सिरिंजचे उत्पादन होत असले तरी सोमवारपासून ते बंद करण्याचा विचार आहे.
पंतप्रधानांना पत्र - नाथ म्हणाले, प्रदूषण मंडळाला वाटते, की हे प्लांट डिझेल जनरेटरवर चालवले जात आहेत. आम्ही असे करत नसल्याचे आश्वासन त्यांना दिले, पण त्यांनी ऐकले नाही. कंपनीलाच उत्पादन थांबवण्यास सांगण्यात आले. सोबतच तसे न केल्यास कारवाई करून प्लांट सील करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या संदर्भात एचएमडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले आहे. यात त्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सिरिंजला एक क्रिटिकल मेडिकल डिव्हाइस म्हणून घोषित करण्यात यावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे. कंपनीने आरोग्य मंत्रालयालाही पत्र लिहिले आहे आणि यात रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांप्रमाणे विशेष सूट देण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.