मुंबई : आगामी आठवड्यात बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि जोडून येणाऱ्या सुट्या यामुळे जवळपास सात दिवस बँकिंग व्यवहार थंडावणार आहेत. परिणामी, २९ सप्टेंबर रोजीच बँकांचे व्यवहार मार्गी न लावल्यास या व्यवहारांसाठी ७ आॅक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
येत्या ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबर रोजी बँका अर्धवार्षिक कामांमुळे जरी सुरू असल्या तरी ग्राहकांसाठी त्या बंद असतील. त्यानंतर २ आॅक्टेबरला गांधी जयंती, ३ आॅक्टोबरला दसरा आल्यामुळे बँकांना सुट्टी आहे. तर ४ आॅक्टोबर रोजी शनिवार असल्याने सर्व बँका अर्धा दिवस खुल्या असतील. ५ आॅक्टोबरला रविवार आल्याने आठवड्याची सुट्टी आहे. यावर्षी बकरी ईद ५ आॅक्टोबरला आहे. मात्र, सरकारी अधिसूचनेनुसार दिनदशिर्केत ६ आॅक्टोबरला बकरी ईद नमूद करण्यात आली असल्यामुळे बँकांना सोमवारी सुट्टी आहे. त्यानंतर मंगळवारी ७ तारखेला बँका नियमितपणे सुरू होतील. परंतु, आठवडाभराची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी बराचवेळ जाणार आहे. सहाजिकच ७ आणि ८ आॅक्टोबरला बँकांमध्ये प्रचंड गर्दी उसळेल. त्यामुळे अतिमहत्त्वाची बँकांची कामे २९ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली नाहीत, तर ७ आॅक्टोबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
एटीएममध्येही खडखडाट ?
२९ आॅक्टोबरनंतर ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबर रोजी बँकांचे कार्यालयीन कामकाज सुरू असल्याने त्या कालावधीत एटीएममध्ये पैशांचा भरणा केला जाईल. मात्र, २ आॅक्टोबर व ३ आॅक्टोबर दोन्ही दिवस लागोपाठ सुट्या असल्याने एटीएममध्ये पैशांचा भरणा होणार नाही. आधीच जोडून आलेल्या सुट्यांमुळे एटीएममधून पैशांच्या व्यवहाराचे प्रमाण वाढणार आहे. त्यात जर दोन दिवस एटीएम मशीनमध्ये पैशाचा भरणा झाला नाही तर रोखीची मोठी समस्या उपलब्ध होईल.
धनादेश क्लिअर होण्यासाठी लागणार सहा दिवस
विविध बँकांत भरल्या जाणाऱ्या धनादेशांच्या क्लिअरिंगसाठी सध्या किमान ४८ तासांचा कालावधी लागतो. ही प्रक्रिया जरी संगणकीय असली तरी, बँकांचे कामकाजच थंडावणार असल्याने धनादेशाच्या क्लिअरिंगसाठी किमान सहा दिवसांचा कालावधी लागेल, असा अंदाज बँकिंग वर्तुळातील लोकांनी व्यक्त केला. २९ आॅक्टोबर रोजी जमा होणारे धनादेश १ आॅक्टोबरपर्यंत क्लिअर होतील. त्यानंतर ग्राहकाला प्रत्यक्ष बँकेत धनादेश भरण्यासाठी ३ आॅक्टोबर, शनिवारी जाता येईल. मात्र ते धनादेश तातडीने क्लिअर होणार नाहीत.
बँकिंग व्यवहार आताच मार्गी लावा
आगामी आठवड्यात बँकांच्या अर्धवार्षिक कामकाजांची पूर्तता आणि जोडून येणाऱ्या सुट्या यामुळे जवळपास सात दिवस बँकिंग व्यवहार थंडावणार आहेत
By admin | Published: September 24, 2014 01:53 AM2014-09-24T01:53:48+5:302014-09-24T01:53:48+5:30