मुंबईनं अनेकांना भरभरून दिलं आहे. मुंबईकर घडाळ्याच्या काट्यावरच धावतात असं म्हणतात. मुंबईत यावं, काम करावं आणि चांगलं आयुष्य जगावं अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे कामगारवर्गाचे पाय अनेकदा आपसूकच मुंबईच्या दिशेनं वळताना दिसतात. पण आता हीच मुंबई देशातील सर्वाधिक महागडं शहर ठरलंय. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
मुंबईत गेल्या वर्षभरात घरभाड्यात विक्रमी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबई हे देशातील सर्वात महागडं शहर ठरलंय. मर्सरच्या 'कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हे-२०२३' नुसार, भारतात प्रवासींसाठी मुंबई हे सर्वात महाग शहर आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे गेल्या वर्षभरात घरभाड्यात १५-२० टक्क्यांनी झालेली वाढ. अहवालानुसार, सर्वेक्षण केलेल्या भारतीय शहरांमध्ये चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि पुणे येथे राहण्याचा खर्च मुंबईच्या ५० टक्क्यांहून कमी आहे.
म्हणून वाढतंय घरभाडं
"एमएमआरमध्ये सुमारे १० हजार इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी सरकारनं दिलेल्या सवलतींमुळे अनेक प्रकल्प सुरू झाले आहेत. काही रखडलेले प्रकल्पही सुरू झाले आहेत. या इमारतींमधील रहिवासी नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. भाडेकरूंची संख्या अचानक वाढली आहे. अशा स्थितीत घरभाडं वाढणं स्वाभाविक आहे," अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी दिली.
वर्क फ्रॉम होमही संपलं
वर्क फ्रॉम होम संपल्यामुळे मुंबईत परतलेल्या लोकांच्या घरांच्या वाढत्या मागणीमुळे भाडं वाढलं आहे. अशा स्थितीत भाड्यानं मिळणाऱ्या जागा कमी असल्यानं आणि मागणी तुलनेनं जास्त असल्यानं घरांची भाडी वाढली आहेत. यामध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे.