Join us

डॉलरने अख्ख्या जगाच्या खिशाला लावली कात्री इतर चलन घसरल्याने जगणे महागले; चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 1:33 PM

अमेरिकी डॉलर अन्य चलनांच्या तुलनेत मजबूत झाल्यामुळे जगण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

वॉशिंगटन : अमेरिकी डॉलर अन्य चलनांच्या तुलनेत मजबूत झाल्यामुळे जगण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे गरीब असो वा श्रीमंत कोणताच देश या संकटातून सुटलेला नाही. डॉलर मजबूत झाल्यामुळे संपूर्ण जगाच्याच खिशाला कात्री लागली आहे. डाॅलरचे मूल्य वाढल्यामुळे आयात महागली आहे. भारतासह सर्वच देशांसमोर ही चिंता आहे.

जीवनावश्यक वस्तू महागल्यामुळे लोकांना कुटुंबाचा खर्च भागविणे अशक्य झाले आहे. यासंबंधीच्या कहाण्या जगभरातून समोर येत आहेत. इजिप्तमधील सुरक्षा कर्मचारी मुस्तफा गमाल (२८) याला कुटुंब पोसणे अशक्य झाल्यामुळे त्याने आपली पत्नी आणि एक वर्षाची मुलगी यांना त्याच्या गावी आई-वडिलांकडे पाठवून दिले आहे. त्याने जेवणातून मांस बाद केले आहे. नैरोबीतील वाहनांचे सुटे भाग विकणारा एक विक्रेता, इस्तंबुलमधील कपडे विकणारा आणि इंग्लंडच्या मॅंचेस्टरमधील एक वाइनविक्रेता या सर्वांची अशीच अवस्था आहे. 

Inflation In India : महागाई छळत राहणार; लढाई दीर्घकाळ चालणार

डॉलर १८ टक्क्यांनी मजबूत 

कॉर्नेल विद्यापीठातील व्यापार धोरणाचे प्राध्यापक ईश्वर प्रसाद यांनी सांगितले की, डॉलर मजबूत झाल्यामुळे अमेरिका वगळून उर्वरित जगाची अवस्था बिकट झाली आहे. यातून पुढील वर्षी मंदी येऊ शकते. यंदा डॉलर १८ टक्क्यांनी वाढला असून, मागील महिन्यात तो २० वर्षांच्या उच्चांकावर गेला. 

श्रीमंत देशांनाही फटका

यंदा भारतीय रुपया १० टक्क्यांनी घसरला. इजिप्तचा पाउंड २० टक्क्यांनी, तर तुर्कस्तानचा लिरा २८ टक्क्यांनी खाली आला. श्रीमंत देशही याला अपवाद नाहीत. युरोपीय संघाच्या एक युरोची किंमत २० वर्षांत प्रथमच १ डॉलरपेक्षा कमी झाली आहे. ब्रिटिश पाउंड १८ टक्क्यांनी घसरला आहे. 

असा झाला  परिणाम

इतर देशांची आयात महागली आहे. आयात महागल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढत आहेत. डॉलरमध्ये उसनवाऱ्या करणाऱ्या कंपन्या, ग्राहक आणि सरकारांचा खर्च वाढला आहे. कारण त्यांना डॉलरसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. अन्य देशांच्या केंद्रीय बँकांना महागाई रोखण्यासाठी व्याज दर वाढवावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक वृद्धीला खीळ बसत आहे. भारतात ऑगस्टमध्ये बदामाच्या ४०० केंटनरची आयात झाली. गेल्यावर्षी हा आकडा १२५० एवढा हाेता. रुपयाच्या विक्रमी घसरणीमुळे कच्चा माल, वाहतूकीचा खर्च इत्यादी प्रचंड महागले आहे. लाेकांनी वस्तू खरेदी केल्याच नाही तर संपूर्ण पुरवठा साखळीवर परिणाम हाेताे.

 - रवींद्र मेहता, बदामाचे व्यापारी

टॅग्स :महागाईअमेरिका