अजय पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही वर्षांपासून अमेरिका व चीनमधील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी घटली होती. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नव्हता. मात्र, या वर्षी व्यापार युद्धाचा कोणताही परिणाम कापसाच्या मागणीवर राहणार नसून, भारताचीही निर्यात यंदा वाढणार आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा कापसाचा पेरादेखील कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढणार असल्याने या वर्षी कापसाला हमीभावापेक्षाही जास्त भाव मिळण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत कापसाची पेरणी १४ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
गाठींसह सरकीला सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास खासगी बाजारातदेखील कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. सध्या कापसाचा भाव ७ हजार ७०० रुपयांवर आहे.
भाव वाढण्याची कारणे
- गेल्या वर्षाच्या तुलनेत कापसाची पेरणी कमी
- या वर्षी भारतातून ७० लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता
- उत्पादन कमी व मागणी जास्त असल्याने चांगला भाव मिळण्याची शक्यता
- आंतरराष्ट्रीय बाजारात सरकी व गाठींचे दरदेखील वाढले
या वर्षी कापसाची सध्याची स्थिती पाहता गुणवत्ता चांगली राहण्याची शक्यता आहे. हीच स्थिती पुढील तीन महिने कायम राहिल्यास कापसाला हमीभावापेक्षाही चांगला भाव मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारदेखील सद्य:स्थितीत चांगले आहेत. - प्रदीप जैन, संचालक, खान्देश जिनिंग असोसिएशन