मुंबई - तुळशीच्या लग्नानंतर सुरू झालेली लग्नसराई, पुढील महिन्यात असलेला ख्रिसमसचा सण आणि नववर्ष या पार्श्वभूमीवर सुटीचा हंगाम सुरू होणार आहे. त्यासाठी देशभरातील अनेक पर्यटक शहरांतील हॉटेलमध्ये आताच बुकिंग करीत असल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर उदयपूर, उटी, म्हैसूर, गोवा, कूर्ग अशा प्रसिद्ध पर्यटनस्थळांवरील तारांकित हॉटेल्सचे दर ७५ हजारांपासून १ लाखांच्या वर गेले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी सुटीचे नियोजन करणाऱ्या लोकांना या कालावधीमध्ये अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. सध्या सर्वच प्रमुख शहरांतील हॉटेल्सचे दर हे गेल्या वर्षीपेक्षा किमान १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत.
ज्यांना २५ डिसेंबरच्या आठवड्यात प्रवास करायचा आहे अशा लोकांना काही लोकप्रिय ठिकाणांसाठी दुहेरी प्रवासासाठी किमान १० हजार रुपये ते कमाल २३ हजार रुपये इतके दर मोजावे लागणार आहेत.
प्रवास नियोजन करणाऱ्या कंपन्यांकडून प्राप्त माहितीनुसार, राजस्थानमधील जयपूर, उदयपूर, बिकानेर आणि जैसलमेर तसेच गोवा, ऊटी येथील अनेक तारांकित हॉटेल्समध्ये आलिशान लग्न सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाले आहे.
५ ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी येथील तारांकित हॉटेलपैकी हॉटेलच्या बहुतांश खोल्या लग्नसराईसाठी बुक झाल्या आहेत. २५ ते १ जानेवारी या कालावधीमध्ये अनेक लोक वर्षाखेरीजचा आठवडा म्हणून देखील सुटी घेत पर्यटनाचे नियोजन करतात. त्यापैकी अनेकांनी आतापासूनच बुकिंग केले आहे.
‘स्टार’नुसार दरपर्यटनासाठी लोकप्रिय अशा शहरांतील थ्री स्टार हॉटेलमधील दर किमान १० हजार रुपये (प्रति रात्र), फोर स्टार हॉटेल किमान १२ ते १८ हजार रुपये (प्रति रात्र), तर फाइव्ह स्टार हॉटेलमधील दर ३५ हजार ते तब्बल १ लाख रुपयांपर्यंत (प्रति रात्र) पोहोचले आहेत.