Join us

आवडत्या चॅनेलसाठी मोजा अधिक नोटा; देशातील प्रमुख ब्रॉडकास्टर्सने वाढवले दर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 1:46 PM

झी एंटरटेन्मेंट, व्हायकॉम १८ आणि सोनी पिक्चर्स यांनी आपल्या चॅनल्सचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: टीव्ही म्हणजे घराघरात असणारे हक्काचे मनोरंजनाचे साधन; परंतु आता आवडती चॅनल्स पाहणे महाग होणार आहे. चॅनल्सच्या कंटेट निर्मितीवरील खर्च वाढत असल्याने देशातील आघाडीच्या ब्रॉडकास्टर्सनी त्यांच्या टीव्ही चॅनल्सच्या मासिक शुल्कात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्यांचे मनोरंजन महागणार आहे.

झी एंटरटेन्मेंट, व्हायकॉम १८ आणि सोनी पिक्चर्स यांनी आपल्या चॅनल्सचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४ हे निवडणूक वर्ष असल्याने चॅनल्सचे दर वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये म्हणून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) चॅनल्सच्या रेटकार्डकडे गांभीर्याने पाहत आहे. (वृत्तसंस्था)

कधीपासून लागू होणारनवी दरवाढ?

  • नेटवर्क १८ आणि व्हायकॉम १८ यांनी भारतातील चॅनल्सचे दर २० ते २५ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोनी पिक्चर्सने चॅनल्सचा दर १० ते ११ टक्क्यांना वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • १ फ्रेब्रुवारीपासून चॅनल्सचे नवे दर लागू केले जाणार आहेत. नवे दरपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर (रेफरन्स इंटरकनेक्ट ऑफर) ३० दिवसांनी नवे दर लागू केले जाऊ शकतात.
  • डिस्नेकडून अद्याप दर जाहीर करण्यात आलेले नाहीत. बीसीसीआयचे मीडिया हक्क गमावल्याने कंपनी अद्यापही दरवाढीबाबत विचार करीत आहे. आयसीसीचे टीव्ही राइट्स अद्यापही डिस्नेकडेच आहेत.

सर्वाधिक दरवाढ कुणाची? कशामुळे?

  • व्हायकॉम १८ ने स्पोर्टस् राइट्ससाठी ३४ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम गुंतविली आहे. त्यामुळे सर्वाधिक वाढ व्हायकॉम १८ कडून करण्यात आली आहे, असे 
  • उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. 
  • आयपीएल, बीसीसीआयचे मीडिया हक्क, क्रिकेट दक्षिण आफ्रिका मीडिया राइट्स आणि २०२४ च्या ऑलिम्पिक हक्कांचा समावेश आहे. बीसीसीआयचे हक्क मिळाल्याने महसुलात वाढ व्हावी, यासाठी व्हायकॉम १८ प्रयत्नशिल आहे.

वादामुळे गोठवले दर?

  • नोव्हेंबर २०२२ मध्ये ट्रायने चॅनल्सच्या नव्या दरपत्रकाची (एटीओ ३.०) अंमलबजावणी सुरू केली. त्यानंतर ब्रॉडकास्टर्सनी दुसऱ्यांदा चॅनल्सच्या किमती वाढवल्या आहेत. 
  • मागील दरपत्रकाच्या (एटीओ २.०) अंमलबजावणीत आलेल्या अडथळ्यांमुळे फ्रेब्रुवारी २०२३ च्या आधीपासून तीन वर्षे सर्व चॅनल्सच्या किमती गोठवल्या होत्या. 
  • ब्रॉडकास्टर्स आणि केबल टीव्ही कंपन्यांमधील वाद सुरू असतानाच फ्रेबुवारी २०२३ मध्ये दरवाढ लागू केली होती. त्यामुळे ब्रॉडकास्टर्स केबल टीव्ही ऑपरेटर्सचे सिग्नल बंद केले होते. 
  • ब्रॉडकास्टर्सकडून आपल्या चॅनल्सचे दर कार्ट आणि बुके अशा दोन्ही प्रकारे जाहीर करावे लागतात. सोयीचे आणि स्वस्त पडत असल्याने बहुतांश ग्राहक बुके घेणे पसंत करतात.
टॅग्स :टेलिव्हिजनव्यवसाय