Lokmat Money > बिझनेस न्यूज > देश-परदेश / पंतप्रधान मोदी

देश-परदेश / पंतप्रधान मोदी

स्टार्ट अप इंडिया.!

By admin | Published: August 16, 2015 11:44 PM2015-08-16T23:44:18+5:302015-08-16T23:44:18+5:30

स्टार्ट अप इंडिया.!

Country-abroad / Prime Minister Modi | देश-परदेश / पंतप्रधान मोदी

देश-परदेश / पंतप्रधान मोदी

टार्ट अप इंडिया.!
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचा नारा : भ्रष्टाचाराची वाळवी समूळ नष्ट करू
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनापर्यंत म्हणजेच 2022 सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सव्वाशे कोटी भारतीयांसमोर संकल्प मांडला. युवकांमधील उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी ‘स्टार्ट अप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया’ असा नवा नाराही दिला. देशाच्या 69व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून ते जनतेला संबोधित करीत होते. सोनेरी रंगाचा पोशाख घातलेल्या मोदींनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर तब्बल दीड तास देशाला संबोधित करीत गेल्या
15 महिन्यांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडला.
आपल्या उत्साहपूर्ण भाषणात पंतप्रधान म्हणाले, की आजची सकाळ सव्वाशे कोटी देशवासीयांच्या स्वप्नांची सकाळ आहे. त्यांच्या संकल्पांची सकाळ आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले, ज्यांनी स्वप्न सोडले नाही, संकल्प सोडला नाही. अशा देशवासीयांना माझा प्रणाम.
युवा, साहित्यिक, समाजसेवक यांनी जगभरात भारताचे नाव उचांवले आहे. अशांचा मला अभिमान आहे. आपले लक्ष्य विकास आहे. विकासाच्या माध्यमातून आपल्याला चैतन्य निर्माण करायचे आहे, असेही ते म्हणाले. सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे प्रशासनाच्या विविध घटकांमधील भ्रष्टाचार नष्ट होण्यास मदत झाली आहे. संपूर्ण देशाला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न आपले पाहिले आहे. तो भारत निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कितीही विरोध झाला आणि कितीही संकटांना सामोरे जावे लागते तरी मी भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न साकार करून राहील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 69 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करताना दिली.
ते म्हणाले की, गेल्या 14 महिन्यांमध्ये सरकारवर एकाही नव्या पैशाच्या भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. तुम्ही मला ज्या भ्रष्टाचारमुक्तीसाठी या पदावर बसविले ते स्वप्न मी साकार करून राहील. भ्रष्टाचारामुळे सामान्य माणसाला अजूनही समस्यांना सामोरे जावे लागते आहे. भ्रष्टाचार म्हणजे वाळवी आहे. ही वाळवी नष्ट करण्यासाठी वेळोवेळी गरज इंजेक्शनची गरज आहे. त्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागणार आहेत. सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे दलालीचे उच्चाटन करण्यात मदत झाली आहे. गेल्या वर्षी केंद्रीय अन्वेषण संस्थेने भ्रष्टाचाराविरोधात 1800 गुन्हे दाखल केले. त्याआधीच्या वर्षात 800 गुन्हे नोंदवण्यात आले होते.
काळ्या पैशाचा मुद्दाही पंतप्रधानांनी अधोरेखित केला. ते म्हणाले, काळ्या पैशांसंदर्भात जे काम तीन वर्षे झाले नाही ते आम्ही एका आठवड्यात केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली समिती नेमली. विविध देशांशी सहकार्य करार केले. कठोर कायदा केला. त्यामुळे आता काळा पैसा बाहेर पाठवणे अशक्य आहे. शिवाय, काळा पैसा माफी योजनेनंतर सुमारे 6 हजार 500 कोटी रुपये बाहेर आल्याचेही त्यांनी भाषणात नमुद केले.
पंतप्रधानांनी कोळसा, स्पेक्ट्रम आणि एफ.एम. रेडियोच्या परवान्यांची उदाहरणे दिली. ते म्हणाले, कोळसा खाणींचा नव्याने पारदर्शक पद्धतीने लिलाव केल्यामुळे सरकारी तिजोरीत 3 लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे. त्यातील 1 हजार 100 कोटी आतापयर्ंत मिळाले आहेत. ‘एफएम’ रेडिओ लहरींचा (स्पेक्ट्रम) लिलाव केला जाऊ नये म्हणून दबाव आला होता. मात्र आम्ही तो झुगारुन लावला. सध्या 80-82 शहरात हा लिलाव सुरू आहे. त्याची रक्कम आताच हजारो कोटींच्या पुढे गेली आहे. ही रक्कम भविष्यात गरिबांच्या कामाला येणार आहे. ते म्हणाले की, अटल पेन्शन योजना, जीवन सुरक्षा विमा योजना अशा योजनांच्या माध्यमातून गरीबांना आम्ही आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अनेकांना हे ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना विविध लाभ मिळणार आहेत. कामगार भविष्यनिर्वाह निधीमध्ये पडून असलेले कामगारांचे 27 हजार कोटी रुपये देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
---
महिला उद्योजिकांना प्रोत्साहन द्या
सव्वा लाख बँक शाखांपैकी प्रत्येक शाखेने किमान एका दलित किंवा आदिवासी उद्योजकाला आणि किमान एका महिला उद्योजिकेला प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
---
‘पहल’ने 15 हजार कोटींची बचत
स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान थेट हस्तांतरीत करणार्‍या ‘पहल’ योजनेमुळे 15 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. बिगर-कृषी कामांसाठी अनुदानित युरिया वळवण्याची पध्दत बंद करण्यासाठी ‘कडुनिंबाचा भर असलेल्या युरिया’ची मदत झाली आहे.
---
18,500 गावांना वीज देणार
2022 सालापयर्ंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा तसेच सर्वांना घरे आणि विजेसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याचा सरकारचा संकल्प आहे. पुढील एक हजार दिवसांत सर्व 18 हजार 500 गावे जी अद्याप अंधारात आहेत. त्यांना वीज पुरवठा करण्याचा सरकारचा संकल्प आहे.
---
कनिष्ठ स्तरावरील भरती प्रक्रिया ऑनलाइन
कनिष्ठ स्तरवरावर भरती करताना ज्या मुलाखती घेण्यात येतात त्या पध्दतीवर प्रश्नचिन्ह आहे. ही पध्दत लवकरात लवकर बंद करण्यात यावी. केवळ पारदर्शक ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून भरती करून गुणवत्तेला प्रोत्साहन द्या.
----
गरिबांची र्शीमंती प्रतिबिंबित
गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी केलेल्या काही संकल्पांची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. राज्यांच्या सहकार्याने सर्व शाळांमध्ये शौचालये बांधण्याचे वचन जवळपास पूर्ण झाल्याचे त्यांनी आवर्जून नमुद केले. आर्थिक समावेशकतेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या माध्यमातून 17 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. जन-धन खात्यात जमा झालेल्या 20 हजार कोटी रुपयांवरून भारतातील गरीबांची र्शीमंती प्रतिबिंबित होते आहे.
--
महागाई आणखी कमी करणार
मागील वर्षी पाऊस कमी झाला होता. शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. देशाचे नुकसान झाले होते; पण तरीही महागाई कमी करण्यात आम्हाला यश आले आहे. आमचे सरकार येण्यापूर्वी महागाई दुप्पट होती. आमचे सरकार आले. आम्ही प्रयत्न केले. आणि पाऊस कमी होऊनही महागाई कमी करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. आता गरिबातल्या गरिबाच्या ताटातही अन्न उपलब्ध व्हावे, अशी आमची स्वप्ने आहेत.
--
निवृत्तीवेतनावर तोडगा
माजी सैनिकांच्या एक पद, एक निवृत्तीवेतनाच्या प्रलंबित मागणीला सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. हितधारकांसोबत याबाबत चर्चा सुरू असून, सकारात्मक तोडगा निष्पन्न होईल.
---
कृषी मंत्रालयाचे नामकरण
शेतकर्‍यांच्या कल्याणाच्या गरजेवर भर देण्यात येणार आहे. कृषी मंत्रालयाचे ‘कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय’ असे नामकरण करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. सरकार कृषी उत्पादकता वाढवण्यावर आणि शेतकर्‍यांना वीज आणि सिंचन सुविधा पुरवण्यावर भर देत आहे. 50 हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या आराखड्यासह प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना सुरू करण्यात आली आहे.
------
बँकांनो दलित, आदिवासींना मदत करा
हे वर्ष डॉ. आंबेडकर यांचे 125वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. देशात एकूण बँकांच्या जवळपास सव्वा लाख शाखा आहेत. या प्रत्येक शाखेने यावर्षी किमान एका दलित किंवा आदिवासीला आर्थिक साहाय्य केल्यास सव्वा लाख नवउद्योजक तयार होतील. त्यातून अनेकांना रोजगारही उपलब्ध होईल. यासाठी बँकांनी कटिबद्धता दाखवायला हवी. एका महिलेला तरी त्यांनी प्रोत्साहन द्यायला हवे. उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याची गरज असून, प्रत्येक गावातून याची सुरुवात व्हावी, असेही मोदी म्हणाले.
---
आपली एकता, सरलता, बंधुभाव आपल्या देशाची भक्कम बाजू आहे. त्याला डाग लागता कामा नये. जर देशाची एकता तुटली तर स्वप्ने तुटतील; म्हणून आपल्याला जातीवाद, सांप्रदायिकतेचा गंध लागता कामा नये.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: Country-abroad / Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.