- चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी चालू हंगामात जूनअखेर सुमारे ५२ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत. त्यातील ४८ लाख ६९ हजार १५७ लाख टन साखर निर्यातीसाठी बाहेर पडली असून, ४५ लाख टन ३१ हजार ७४८ टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे तर ३ लाख ३७ हजार ४०९ टन साखर वाटेत अथवा बंदरात आहे.
१ आॅक्टोबरपासून नवा साखर हंगाम सुरू होत आहे. तत्पूर्वी या वर्षातील ६० लाख टन निर्यातीचे केंद्र सरकारने दिलेले लक्ष्य गाठले जाण्याची शक्यता आहे. आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने दिलेल्या आकडेवारीनुसार यामध्ये २३ लाख ९१ हजार ३७९ टन कच्ची (रॉ) साखर, २० लाख ८ हजार ५०५ टन पांढरी (व्हाइट), ३ लाख ३१ हजार ८६४ टन रिफाइण्ड इंडियन साखरेचा समावेश आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे निर्यातीत थोडेफार अडथळे आले असले तरी चालू हंगामात ६० लाख टन साखर निर्यातीचे दिलेले लक्ष्य पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे.
साखरेची ही निर्यात ७३ देशांना झाली आहे. त्यात इराणला सर्वाधिक १० लाख ६५ हजार २९० टन साखरेची निर्यात झाली आहे. त्याखालोखाल सोमालिया, इंडोनेशिया, श्रीलंका, अफगाणिस्तान, मलेशिया, सुदान, बांगलादेश आदींचा क्रमांक
लागतो.
तणाव निवळल्यास चीनलाही निर्यात
भारत चीनलाही ४० लाख टन साखरेची निर्यात करतो. ब्राझिल, क्युबा आणि थायलंडमधून चीनला साखर निर्यात होते. चीनला भारताची साखर स्वस्त पडते. मात्र, सध्या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि तणावामुळे ही निर्यात ठप्प झाली आहे. चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार, चीनशी आर्थिक करार रद्द करण्याचे, चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचे अस्र उपसण्यात आले आहे. मात्र, तणाव निवळल्यास येत्या तीन महिन्यांत चीनला भारतातून सुमारे ३ लाख टन साखरेची निर्यात केली जाऊ शकते, असे आॅल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनचे चेअरमन प्रफुल्ल विठलानी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
देशातून आतापर्यंत झाली ४८ लाख टन साखर निर्यात
१ आॅक्टोबरपासून नवा साखर हंगाम सुरू होत आहे. तत्पूर्वी या वर्षातील ६० लाख टन निर्यातीचे केंद्र सरकारने दिलेले लक्ष्य गाठले जाण्याची शक्यता आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 02:56 AM2020-07-09T02:56:43+5:302020-07-09T02:57:18+5:30