Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकारच्या सर्वव्यापी गोंधळामुळे देश मंदीच्या गर्तेत

मोदी सरकारच्या सर्वव्यापी गोंधळामुळे देश मंदीच्या गर्तेत

डॉ. मनमोहन सिंग यांची टीका; नोटाबंदीने केला घात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 06:31 AM2019-09-02T06:31:22+5:302019-09-02T06:31:27+5:30

डॉ. मनमोहन सिंग यांची टीका; नोटाबंदीने केला घात

The country is in a mood of recession due to the all-out confusion of the Modi government | मोदी सरकारच्या सर्वव्यापी गोंधळामुळे देश मंदीच्या गर्तेत

मोदी सरकारच्या सर्वव्यापी गोंधळामुळे देश मंदीच्या गर्तेत

नवी दिल्ली : मोदी सरकारने सर्व क्षेत्रांमध्ये घातलेल्या गोंधळामुळे अर्थव्यवस्थेचा विकास मंदावला आहे, अशी टीका माजी पंतप्रधान व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी रविवारी केली. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत चिंताजनक असून ती सावरण्यासाठी मोदी सरकारने सूडाचे राजकारण बाजूला ठेवून सूज्ञ व्यक्तींशी संवाद साधला पाहिजे असेही ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, गेल्या तिमाहीतील अर्थव्यवस्थेचा विकासदर ५ टक्के इतकाच असून ही आगामी प्रदीर्घ मंदीची चाहूल आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत झपाट्याने विकास साधण्याची शक्ती आहे. मात्र सर्व क्षेत्रातील गैरव्यवस्थापनामुळे आपला देश मंदीकडे वाटचाल करत आहे. देशातील युवक, शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, दुर्बल घटकांना अर्थव्यवस्थेचे उत्तम फायदे मिळायला हवेत. मात्र सध्या ते त्यापासून वंचित आहेत. नोटाबंदी, घाईगर्दीने अमलात आणलेली जीएसटी प्रणाली यामुळे देश आर्थिक संकटात सापडला आहे. या मानवनिर्मित चुकांच्या निराकरणासाठी सरकारने तातडीने पावले उचलायला हवीत.

मनमोहनसिंग म्हणाले की, देशातील अनेक यंत्रणांवर घाला घातला जात असून त्यांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने राखीव निधीपैकी १.७६ लाख कोटी रुपये मोदी सरकारच्या तिजोरीत वळते केले. याविषयावर रिझर्व्ह बँकेने मौन बाळगणे परवडणारे नाही. देशांतर्गत असलेल्या मागणीत घट झाली आहे. क्रयशक्तीतील वाढ तसेच जीडीपी विकासदर, महसुली उत्पन्नातही मोठी घट झाली आहे. लहान, मोठ्या उद्योजकांना लक्ष्य केले जात आहे. करवसुलीच्या नावाखाली दहशत पसरविली जात आहे. अशा उपायांनी अर्थव्यवस्था रुळावर येणार नाही.

बेकारीचे प्रमाण वाढले
मनमोहनसिंग म्हणाले की, मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशात बेकारी वाढली असून एकट्या वाहननिर्मिती क्षेत्रात ३.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. अन्य क्षेत्रांतही हे लोण पसरत आहे. चलनफुगवटा कमी असल्याचे मोदी सरकार अभिमानाने सांगत असले तरी त्याची किंमत देशातील शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे. त्यांच्या उत्पन्नात विलक्षण घट झाली आहे. त्याचा परिणाम देशातील ५० टक्के जनतेवर होत आहे. या सरकारच्या काळात देशाची आर्थिक विश्वासार्हता धोक्यात आली आहे. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांपासून घुमजाव केल्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारही नाराज आहेत. जागतिक परिस्थितीमध्ये होत असलेल्या बदलांचा योग्य फायदा घेत देशाची निर्यात वाढविणेही या सरकारला जमलेले नाही.

वित्तमंत्र्यांनी दिली चपखलपणे बगल

सुडाचे राजकारण बाजूला ठेवून या मानवनिर्मित संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारने सर्व सूज्ञ लोकांना बरोबर घ्यावे या डॉ. मनमोहनसिंग यांच्या म्हणण्यास केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी चपखलपणे बगल दिली. डॉ. सिंग यांच्या मतावर प्रतिक्रिया विचारता त्या म्हणाल्या, खरंच ते असे म्हणाले? ठीक आहे. धन्यवाद. ते त्यांचे म्हणणे आहे, एवढेच मी म्हणेन. बस्स. माझे उत्तर एवढेच आहे.

Web Title: The country is in a mood of recession due to the all-out confusion of the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.