नवी दिल्ली : देशातील ८६ टक्के चलन व्यवहारातून बाद करण्यात आल्याच्या अभूतपूर्व निर्णयानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. बाजारात चलनाची कोणतीही टंचाई नाही, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. जेटली यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेचे नोट छपाईचे कारखाने आणि सेक्युरिटी प्रिंटिंग अॅण्ड मिंटिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडिया (एसपीएमसीआयएल) यांनी नव्या नोटांसाठी अव्याहतपणे काम केल्यानेच हे शक्य झाले आहे. एसपीएमसीआयएलच्या ११व्या स्थापना दिनी येथे बोलताना जेटली म्हणाले की, नोटाबंदीवरून आरोप करणे आणि व्यंगात्मक टीका करणे सोपे काम आहे. पण, हा निर्णय घेणे सर्वांत कठीण काम होते. बहुधा नोटाबंदीची ही जगातील सर्वांत मोठी मोहीम आहे. याचे लक्ष्य भ्रष्टाचार, काळा पैसा आणि बनावट चलन यांना समूळ नष्ट करणे हे आहे. आर्थिक विभागाचे सचिव शक्तिकांत दास म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयानंतर एसपीएमसीआयएलच्या कर्मचाऱ्यांनी नव्या नोटा छापण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले. नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये तर या कर्मचाऱ्यांनी आठवड्यात सातही दिवस काम केले. एका दिवसात तीन शिफ्टमध्ये काम केले. या कर्मचाऱ्यांनी नाशिक आणि देवास येथे आपल्या कारखान्यातून कोलकाता, गुवाहाटी, चंदीगढ, दिल्ली आणि लखनऊ यांसारख्या ठिकाणी हवाईमार्गाने नोटा दाखल केल्या. त्यामुळे नोटाबंदीनंतर काही काळातच नव्या नोटा चलनात आणि बाजारात आणणे शक्य झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
देशात चलनाबाबत स्थिती पूर्वपदावर
By admin | Published: February 18, 2017 12:58 AM