First ATM: आजकाल कोणी एटीएम वापरलंच नाही अशी कोणी फार क्वचितच व्यक्ती सापडेल. पण असा एक देश आहे जिकडे याच महिन्यात पहिलं एटीएम सुरू झालं. तुवालू हा जगातील सर्वात लहान देशांपैकी एक आहे. या देशानं १५ एप्रिल २०२५ रोजी आपलं पहिलं एटीएम सुरू करून इतिहास रचला. हा देश आपल्या सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. सीएनएननं दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलिया आणि हवाई दरम्यानच्या या छोट्याशा देशात आतापर्यंत सर्व कामं रोखीनं होत होती. येथे एटीएम नव्हते. एटीएम सुरू होणं हे या देशासाठी मोठं यश आहे. पंतप्रधान फालेटी टिओ यांनी फुनाफुटी या मुख्य बेटावर त्याचं उद्घाटन केल. त्यांनी स्थानिकांसोबत केक कापला आणि तुवालूसाठी हा एक महत्त्वपूर्ण क्षण असल्याचं म्हटलं.
नॅशनल बँक ऑफ तुवालूचे जनरल मॅनेजर सिओस टिओ यांनी या नव्या सुविधेचं वर्णन 'गेम चेंजर' असं केलं आहे. यामुळे देशातील ११,२०० लोकांसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. पॅसिफिक टेक्नॉलॉजी लिमिटेडचे निसार अली यांनी हे एटीएम लोकांना आधुनिक बँकिंग सेवांशी जोडेल, अशी प्रतिक्रिया दिली.धोनी, अशनीर ग्रोव्हर ते दीपिका पादुकोण... BluSmart मध्ये दिग्गजांचे पैसे बुडाले, आता कंपनी बुडण्याच्या मार्गावर
१० चौरस मैलांवर पसरलाय देश
तुवालू हा जगातील सर्वात लहान देशांपैकी एक आहे. हा फक्त १० चौरस मैलांवर पसरलेला आहे. यात नऊ बेटांचा समावेश आहे. लहान असूनही २०२३ मध्ये तीन हजारांहून अधिक पर्यटक इथे आले होते. फुनाफुतीमध्ये असलेले एकमेव विमानतळ शेजारच्या फिजीशी केवळ काही उड्डाणांना जोडतं. येथे देशांतर्गत उड्डाणं नसल्यामुळे लोक बेटांदरम्यान फेरीनं प्रवास करतात.
तुवालूच्या भौगोलिक स्थानामुळे हे अवघड होते. त्याचबरोबर समुद्राची पातळी वाढल्यानं देशाची जमीन कमी होत आहे. त्याचबरोबर शेतीचंही नुकसान होत आहे. तुवालू हा हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांपैकी एक आहे. २०२१ मध्ये तुवालूचे परराष्ट्रमंत्री सायमन कॉफी यांनी गुडघाभर पाण्यात उभं राहून संयुक्त राष्ट्रसंघात भाषण केलं होतं. यामुळे हा देश जगभर चर्चेत आला.
तुवालू हा छोटासा देश असला तरी एटीएम सुरू झाल्यानं इथल्या लोकांच्या आयुष्यात मोठा फरक पडेल. आता लोकांना सहज पैसे काढता येणार आहेत. त्यांना बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे. हे पाऊल तुवालूला आधुनिक जगाशी जोडण्यास मदत करेल. समुद्राच्या वाढत्या पातळीच्या आव्हानाशी झुंजणाऱ्या तुवालूसाठी या एटीएमनं एक आशेचा किरण आणला आहे. यामुळे लोकांची सोय तर होईलच, शिवाय देशाच्या विकासालाही मदत होईल.