नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान वाहतुकीसंदर्भात महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. लॉकडाऊन कालावधीत देशांतर्गत विमानसेवांवर (डोमेस्टीक) लावण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक नियमावलींना नोव्हेंबर 24 पर्यंत वाढविण्यात आले आहे. मंत्रालयाकडून यासंदर्भातील निर्देश जारी करण्यात आले असून पुढील आदेश येईपर्यंत याची अंमलबजावणीचे या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत विमानसेवेला यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे असणारे निर्बंध कायम असणार आहेत.
कोरोना महामारीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर, 25 मार्चपासून देशातील विमानसेवा बंद करण्यात आली आहे. देशात कोरोना लॉकडाऊनमुळे विमानसेवा आणि रेल्वेसेवा बंदच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे, खासगी विमानसेवा देणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सने 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या कपातीचा निर्णय घेतला आहे. तर, काही आंतरराष्ट्रीय विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनीही देशातील आर्थिक परिस्थिती पाहता, सध्या विमानसेवा उद्योगासाठी फायदेशीर नसल्याचं म्हटलंय. दरम्यान, लॉकडाऊन काळात सरकारने परवानगी दिलेल्या 22 जुलैपर्यंत 1613 देशांतर्गत विमानांचे उड्डाण झाले असून 1,23,475 प्रवाशांना इच्छित स्थळी पोहचविण्यात आले आहे.
दरम्यान, विमान प्रवासाबाबत महाराष्ट्र सरकारने १९ मे रोजी काढलेला आदेशच सध्या राज्यात लागू आहे. या आदेशानुसार राज्यात विमान प्रवासावर बंदी कायम आहे. महाराष्ट्रात विमान वाहतूक सुरू न करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे सरकार विमानसेवा सुरू करण्यासाठी उत्सुक नाही. या कालावधीत सरकारने परवानगी दिलेल्याच विमानांचे उड्डाण होईल. त्यासाठीही, लॉकडाऊन कालावधीतील नियमावलींचे पालन करावे लागणार आहे. म्हणजेच, मास्क , सॅनिटायझर आणि इतर नियमांचे पालन बंधनकारक आहे.