नवी दिल्ली - देशातील सत्तांतर होऊन 7 वर्षे झाल्यानंतर मोदी सरकारने आपल्या कामकाजाचा लेखाजोखा सोशल मीडियातून जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाकडून मोदींच्या कार्यकाळात देशाने केलेल्या विकासाची गाणी गायली केली. मोदी सरकारच्या 7 वर्षीय कामाची तुलना काँग्रेसच्या 70 वर्षांसोबतही करण्यात आली. विशेष म्हणजे कोरोना महामारीने जनता त्रस्त झाली. तरीही, भाजपा नेत्यांनी विकासाचे गोडवेच गायले. आता, देशाचा विकासदर म्हणजेच जीडीपीमध्ये लक्षणीय घट झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना महामारीचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. भारताचा 2021 वर्षातील विकासदर -7.3 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या 40 वर्षातील हा सर्वात खराब विकासदर आहे. सरकारने सोमवारी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चौथ्या तिमाहीसह आकडेवाडी (जानेवारी ते मार्च) जाहीर केली. चौथ्या तिमाहीत विकासदर 1.6 टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, संपूर्ण वर्षभराच्या विकासदरात 7.3 टक्क्यांची मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
एनएसओ म्हणजे राष्ट्रीय संख्याकी कार्यालयाद्वारे देण्यात आलेल्या आकडेवाडीनुसार 2019-20 मधील जानेवारी-मार्च तिमाहीत विकासदरात तीन टक्क्यांची वाढ झाली होती. आकडेवाडीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेतील आकारात 2020-21 च्या कालावधीत 7.7 टक्क्यांची घसरण असणार आहे. चीनच्या जानेवारी-मार्च 2021 मध्ये विकासदरात 18.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाची पहिली लाट आणि मार्च 2020 नंतरच्या काही महिने देशात लागलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये विकासदरात मोठी घसरण झाली आहे. जीडीपीमध्ये घसरण होऊन विकासदर -7.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील जीडीपीची आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी घसरण आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षात जीडीपी रेट 4 टक्के एवढा होता. त्यावरुन, सध्याचा जीडीपी रेट किती मोठ्या प्रमाणात घसरला आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
अर्थमंत्रालयाचे प्रमुख सल्लागार सुब्रमण्यम यांनी म्हटले की, आर्थिक वर्ष 2020-21 मधील पहिल्या तिमाहीत घसरण 24.4 टक्के एवढी होती. आता, 2020-21 मध्ये इकॉनॉमिक कंस्ट्रक्शन -7.3 एवढा आहे, जो फेब्रुवारी महिन्यात अंदाजित -8 टक्क्यांमध्ये काही प्रमाणात सुधारीत आहे.
होय, मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था मंदावली...
लोकमतच्या सर्वेक्षणात दुसरा प्रश्न हा देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात होता. मोदी सरकार 2 च्या कारकीर्दीत अर्थव्यवस्था सुधारली की तिची वाटचाल मंदावली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याही प्रश्नावरील सर्वेक्षण वाचकांना चांगला सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार, 57.68 टक्के वाचकांनी मोदी सरकारच्या कारकीर्दीत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्याचं मत नोंदलं आहे. 33.49 टक्के लोकांना वाटते, अर्थव्यवस्था सुधारली आहे. तर, 8.84 टक्के लोक या प्रश्नावर तटस्थ भूमिका घेताना दिसून आले. त्यामुळे, मोदी सरकारच्या कारकीर्दीत अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्याचं जनमत स्पष्ट दिसून आहे.