नवी दिल्ली-
भारतात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर अनेकांचा परदेशात जाऊन नोकरी करण्याचा कल असतो. यासाठी तरुणाईकडून मल्टिनॅशनल कंपन्यांना प्राधान्य दिलं जातं. पण आज आपण एका अशा दाम्पत्याची गोष्ट जाणून घेणार आहोत की ज्यांनी परदेशातील बक्कळ पगाराची नोकरी सोडून भारतात स्वत:चा बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला. भारतात परतून दोघांनी सुपारीच्या पानांपासून टेबलवेअर प्रोडक्ट बनविण्यास सुरुात केली आणि आज दोघंही व्यवसायातून कोट्यवधींची कमाई करत आहेत.
केरळच्या मदुकई गावातील देवकुमार नारायणन आणि त्यांची पत्नी सारन्या यांच्या यशाची ही कहाणी आहे. दोघांनीही दिल्ली विद्यापीठातून इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न घेऊन दोघंही २०१४ साली संयुक्त अरब अमिरातमध्ये (UAE) नोकरीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. यूएईमध्ये जाऊन देवकुमारनं बड्या टेलिकॉम कंपनीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली तर सारन्यानं सिविल इंजिनिअर पदावर एका वॉटरप्रूफिंग कंपनीमध्ये काम सुरू केलं. दोघंही काम यूएईमध्ये करत होते पण त्याचं लक्ष भारतात होतं.
भारतात येऊन सुरू केलं स्टार्टअप
देवकुमारनं सांगितलं की, नोकरी यूएईमध्ये करत असलो तरी आमचं लक्ष आमच्या गावाकडे लागून असायचं. तसंच १० ते ५ अशी रोजची ठरलेल्या वेळेची नोकरी जास्त काळ करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे भारतात परतण्याचा आम्ही निर्णय घेतला. इथं येऊन स्टार्टअप सुरू केलं. आज आम्ही आमच्या पीढीच्या तरुणांना नोकरी देखील देऊ शकत आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे, असं देवकुमार म्हणाला. २०१८ साली दोघंही भारतात आले आणि इथं येऊन दोघांनी 'पपला' नावाच्या कंपनीची सुरुवात केली.
सुपारीच्या पानांपासून विविध प्रोडक्ट
भारतात येऊन त्यांनी 5 लाख रुपयांची गुंतवणूक करून स्टार्टअप सुरू केला. या अंतर्गत ते सुपारीच्या पानांपासून टेबलवेअर प्रोडक्ट बनवतात. पिशव्यापासून साबण पॅकेजिंग इ. आज त्यांच्या उत्पादनांना भारताव्यतिरिक्त UAE आणि USA सारख्या देशांमध्येही मागणी आहे. सध्या त्यांच्या कंपनीची उलाढाल १८ कोटी रुपये असून त्यांचे काम सांभाळण्यासाठी त्यांनी गावातील सात गरजू महिलांना रोजगारही दिला आहे.
कंपनीनं नावंही 'खास'
सुपारी स्थानिक पातळीवर पाला म्हणून ओळखली जाते आणि लोकांना त्याच्याशी संबंध वाटावा म्हणून ब्रँडचे नाव 'पापला' ठेवल्याचं सरन्या यांनी सांगितलं. सुपारीच्या पानांपासून वाट्या, चमचे, ताट, साबणाचे कव्हर आणि ओळखपत्र असे १८ प्रकारची उत्पादने बनवली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. ही उत्पादनं बनवण्यासाठी झाडांना कोणत्याही प्रकारे इजा होत नाही. यासाठी झाडांची गळून पडलेली पाने वापरली जातात.