Join us  

Nirmala Sitharaman: कोरोना बाधित क्षेत्रासाठी १.१ लाख कोटींची मदत; केंद्र सरकारची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 3:51 PM

कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा सोमवारच्या पत्रकार परिषदेतून केल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक सेक्टर्सवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात होती.अर्थमंत्र्यांनी छोट्या उद्योगांना दिलासा देण्यासाठी इमरजेंन्सी क्रेडिट गॅरंटी स्कीम(ECLGS)मधील निधी वाढवण्याची घोषणा केली आहे.या अंतर्गत व्यावसायिक बँकांच्या MFI ला देण्यात येणाऱ्या कर्जासाठी गॅरंटी दिली जाईल.

नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून भारतात कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येक क्षेत्राला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने जवळपास १.१ लाख कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आरोग्य क्षेत्रासाठी ५० हजार कोटींची मदत केली जाणार आहे. ही रक्कम नॉन मेट्रो मेडिकल इन्फ्रासाठी खर्च करण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक सेक्टर्सवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात होती. मागील काही दिवसांत सरकार कोरोनाने बाधित झालेल्या सेक्टर्सला मदत करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

अर्थमंत्र्यांनी छोट्या उद्योगांना दिलासा देण्यासाठी इमरजेंन्सी क्रेडिट गॅरंटी स्कीम(ECLGS)मधील निधी वाढवण्याची घोषणा केली आहे. सध्या ही योजना ३ लाख कोटींची आहे ती आता ४.५० लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेतंर्गत MSME, हॉस्पिटॅलिटी सेक्टर्सला २.६९ लाख कोटी वितरीत केले जाणार आहेत. तसेच मायक्रो फायनॅन्स इंस्टिट्यूशनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी क्रेडिट गँरंटी स्कीमची घोषणा केली आहे. ही नवी योजना आहे. या अंतर्गत व्यावसायिक बँकांच्या MFI ला देण्यात येणाऱ्या कर्जासाठी गॅरंटी दिली जाईल. या योजनेचा फायदा २५ लाख लोकांना होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.

 

आजच्या पत्रकार परिषदेत ८ आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाणार आहे. त्यातील ४ नवीन आहेत तर एक विशेष आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी देण्यात येणार आहे. राज्यातील लॉकडाऊनमुळे ज्यांना फटका बसला अशांना मदत करण्यासाठी सरकारने या पॅकेजची घोषणा केली आहे. मागील वर्षी कोरोना महामारीने प्रभावित झालेल्यांना क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी सरकारने आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली होती. सरकारने यात एकूण २.७१ लाख कोटींची घोषणा केली होती.

५ लाख पर्यटकांना व्हिसा शुल्क माफ   

आंतरराष्ट्रीय प्रवास सुरु झाल्यानंतर भारतात येणाऱ्या सुरुवातीच्या ५ लाख परदेशी पर्यटकांना व्हिसासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. ही योजना ३१ मार्च २०२२ पर्यंत लागू असेल किंवा ५ लाख पर्यटकांची मर्यादा संपल्यानंतर ही योजना बंद होईल. एका पर्यटकाला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.

 

टॅग्स :केंद्र सरकारनिर्मला सीतारामनकोरोना वायरस बातम्या