Credit Card Scam: क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आहेत. पण, क्रेडिट कार्डच्या वाढत्या वापरासोबतच फसवणुकीच्या घटनाही झपाट्यानं वाढत आहेत. ९ ऑगस्ट रोजी, क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्याच्या बहाण्याने २०० हून अधिक लोकांची ५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीच्या चार सदस्यांना दिल्ली-नोएडा परिसरातून अटक करण्यात आली.
काय होता स्कॅम?स्कॅमर्सनी लोकांना त्यांचे क्रेडिट कार्ड तपशील शेअर करण्यास प्रवृत्त केलं. ते लोकांकडून ई-वॉलेट ऑपरेशन्स आणि इतर गोष्टींवरून पैसे ट्रान्सफर करून घेत होते. रिपोर्टनुसार, ते पॅन आणि जन्मतारीख यांसारखे तपशील विचारायचे आणि त्या माहितीचा वापर व्यक्तीच्या खात्यापर्यंत पोहोचण्यासाठी करायचे.
स्कॅमर्स त्या पैशातून ऑनलाइन सोनं खरेदी करायचे आणि पोर्टर सर्व्हिसच्या मदतीनं ज्वेलर्सकडून ते घ्यायचे. पोलिसांनी ज्वेलर्सच्या खात्यातून फसवणूक केलेल्या पैशांचा शोध लावला आणि पैसे गोठवले. असे घोटाळे वाढत असताना, लोकांनी या फोन कॉल्सबाबत सावध राहणं गरजेचं आहे.
कशी काढतात माहिती?कॉलर्स स्वत:ला बँक कर्मचारी असल्याचं सांगून क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्याची ऑफर देतात. असं करून त्या व्यक्तीचा पर्सनल डेटा मिळवला जातो आणि क्रेडिट कार्ड CVV, OTP आणि अन्य माहिती त्यांना मिळते. हा डेटा ग्राहकांच्या अकाऊंटमधून पैसे काढण्यास पुरेसा असतो.
कसं वाचाल?जर तुम्हाला असा फोन आला तर त्याला प्रतिसाद देऊ नका. क्रेडिट कार्ड नंबर, CVV, पासवर्ड किंवा पिन यासारखी तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करणं टाळा. वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करताना नेहमी काळजी घ्या.कोणताही बँक कर्मचारी किंवा लेंडर कधीही तुमचा वैयक्तिक डेटा विचारत नाही. असा कोणताही मेसेज किंवा कॉल आल्यास ही फसवणूक असल्याचं समजून तात्काळ पोलिसांना त्याची माहिती द्या. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. त्यामुळे कोणताही वैयक्तिक डेटा शेअर करताना तुमचे डोळे, कान उघडे ठेवा आणि सतर्क राहा.