मुंबई : कोविड-१९ साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे क्रेडिट कार्डांवरील व्यवहारांत २०२०-२१ मध्ये वार्षिक आधारावर तब्बल १ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे, असे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. २०२०-२१ मध्ये क्रेडिट कार्डे व डेबिट कार्डे यांद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्याही अनुक्रमे १९ आणि २०.६ टक्क्यांनी घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून क्रेडिट कार्डांवरील व्यवहारांचे मूल्य १३.७ टक्क्यांनी, तर डेबिट कार्डांवरील व्यवहारांचे मूल्य ५.९ टक्क्यांनी कमी झाले आहे.
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यांच्या व्यवहारांचे एकूण मूल्य १४,३४,८१४ कोटी रुपयांवरून घसरून १२,९३,८२२ कोटी रुपयांवर आले आहे.
भारत क्विक रिस्पॉन्स (बीक्यूआर) कोड्सची तैनाती ७६.० टक्क्यांनी वाढून ३५.७० लाखांवर गेली. मार्च २०२०च्या अखेरीस एटीएमची संख्या २.३४ लाख होती. मार्च २०२१ अखेरीस ती २.० टक्क्यांनी वाढून २.३८ लाख झाली. देशात कोरोनाची साथ सुरू असल्याने घराबाहेर पडण्याचे टाळत नागरिक बँकेत जाण्याचे टाळत असल्याचे यातून दिसून येते.
पीपीआय व्यवहारही ७.४ टक्के घटले
रिझर्व्ह बँकेच्या अहवालात म्हटले आहे की, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट्स (पीपीआय) व्यवहारांचा आकार ७.४ टक्क्यांनी घटला आहे. आदल्या वर्षी त्यात १५.७ टक्क्यांची वाढ झाली होती, हे विशेष. या व्यवहारांचे मूल्यही ८.३ टक्क्यांनी घटून १.९७ लाख कोटी रुपयांवर आले आहे. मार्च २०२१च्या अखेरीस पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल्सची संख्या मात्र ६.५ टक्क्यांनी वाढून ४७.२० लाखांवर गेली.