Join us  

Credit Card अपग्रेड करण्यापूर्वी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 4:17 PM

Credit Card Upgrade Tips : आजकाल लोक क्रेडिट कार्डचा प्रचंड वापर करू लागले आहेत. बँका आणि वित्तीय कंपन्याही लोकांना कमी शुल्कात क्रेडिट कार्ड देत आहेत.

नवी दिल्ली : गेल्या 10 ते 15 वर्षांत बँकिंगमध्ये मोठे आणि क्रांतिकारी बदल झाले आहेत. एक काळ असा होता जेव्हा लोक पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर लांबच लांब रांगा लावत असत. पण, तंत्रज्ञानातील बदलामुळे बँकिंग व्यवस्थेत अनेक नवीन सुविधा जोडल्या जाऊ लागल्या. यामध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पेमेंट अशा अनेक नवीन सुविधा सुरू झाल्या आहेत. आजकाल लोक क्रेडिट कार्डचा प्रचंड वापर करू लागले आहेत. बँका आणि वित्तीय कंपन्याही लोकांना कमी शुल्कात क्रेडिट कार्ड देत आहेत.

अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी क्रेडिट कार्डवर मोठ्या सवलती देण्यास सुरुवात केली आहे. लोक महिनाभर क्रेडिट कार्डने सहज खरेदी करतात आणि महिन्याच्या शेवटी त्यांची बिले भरतात. कधीकधी कंपन्या ग्राहकांना त्यांचे क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्याची ऑफर देतात. तर क्रेडिट कार्ड अपग्रेड म्हणजे काय आणि क्रेडिट कार्ड अपग्रेड करताना कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे, याबाबत सविस्तर पाहूयात...

काय आहे क्रेडिट कार्ड अपग्रेड?जेव्हा तुम्ही कोणत्याही बँकेकडून किंवा कंपनीकडून पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेता, तेव्हा ते तुम्हाला बेसिक क्रेडिट कार्ड देतात. यानंतर तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवू शकता. क्रेडिट कार्ड अपग्रेड करताना, मर्यादा वाढवण्याबरोबरच नवीन सुविधाही जोडल्या जातात. पण, यासोबतच बँक तुमच्याकडून जास्त शुल्क आकारते. त्यामुळे अनेकवेळा विचार न करता क्रेडिट कार्ड अपग्रेड करणे तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकते.

क्रेडिट कार्ड अपग्रेड करताना या गोष्टी लक्षात ठेवा...- तुमचा खर्च आणि कमाई व्यवस्थित तपासल्यानंतरच क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्याचा निर्णय घ्या. अनेक वेळा लोक इतरांची क्रेडिट कार्ड पाहून अपग्रेड करतात, ज्याची त्यांना गरज नसते. यामुळे पुढे ते कर्जाच्या जाळ्यात अडकतात. त्यामुळे तुम्हाला या अपग्रेडची गरज आहे की नाही ते तपासा. अन्यथा, क्रेडिट कार्डच्या चार्चमुळे तुम्ही नंतर कर्जाच्या सापळ्यात अडकू शकता.

- क्रेडिट कार्ड अपग्रेड करताना कार्डवरील व्याजदर निश्चितपणे तपासा. अधिक सुविधांसह क्रेडिट कार्डवरही व्याजदर जास्त आकारला जातो. त्यामुळे आधी त्याची योग्य माहिती मिळवा आणि मगच क्रेडिट कार्ड अपग्रेड करा.

- क्रेडिट कार्ड अपग्रेड करताना रिवॉर्ड पॉइंट्सची माहिती घेणे देखील खूप महत्वाचे आहे. कार्ड अपग्रेड करण्यापूर्वी, तुम्हाला शॉपिंग, इंधन रिचार्ज इत्यादींमध्ये किती रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील ते तपासा. हे सर्व तपासूनच निर्णय घ्या.

- बँकेने सक्ती केल्यानंतरच क्रेडिट कार्ड अपग्रेड करू नका. क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्याचा निर्णय तुमचा स्वतःचा असला पाहिजे.

टॅग्स :बँकव्यवसाय