Join us

धक्कादायक! रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांच्या पतसंस्थेचेही पीएमसी बँकेत १०५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 2:23 AM

गेल्या वर्षीच ठेवींमध्ये झाली ९ टक्क्यांची वाढ

मुंबई : भारतातील २२०० बँकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांच्या सहकारी पतसंस्थेचे १०५ कोटी बँकेनेच निर्बंध घातलेल्या पीएमसी बँकेत अडकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.रिझर्व्ह बँक ऑफिसर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वार्षिक अहवालानुसार २०१८ साली संस्थेच्या पीएमसी बँकेतील एकूण ठेवी ९६ कोटी होत्या. त्यात गेल्यावर्षी ९ टक्के वाढ होऊन आता ही रक्कम १०५ कोटी झाली आहे. रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांच्या पतसंस्थेने एकूण ४७८.६४ कोटी गुंतवणूक केली आहे, त्यापैकी ४७३.६४ कोटी दीर्घ मुदतीच्या ठेवी आहेत तर फक्त पाच कोटी मुदती ठेवी आहेत. पतसंस्थेने या सर्व ठेवी विविध अर्बन बँकांमध्ये ठेवल्या आहेत.यापैकी सर्वात मोठी ठेव १०५ कोटी पीएमसी बँकेत आहे. तर त्या खालोखाल १०० कोटी भारत को-ऑपरेटिव्ह बँक, ठाणे भारत सहकारी बँक व अपना सहकारी बँक यात प्रत्येकी ८५ कोटी, सोलापूर जनता सहकारी बँक ५० कोटी व कॉसमास को-ऑपरेटिव्ह बँकेत २५ कोटी अशा ठेवी संस्थेने दिल्या आहेत.याशिवाय रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांच्या पतसंस्थेने मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (मुंबै बँक) प्रत्येकी १००० रुपये दर्शनी मूल्याचे २७८४ शेअर्सही खरेदी केले आहेत. सहकारी कायद्यानुसार पतसंस्थांना आपल्या ठेवी केवळ सहकारी बँकांमध्येच ठेवता येतात. इतर बँकांत ठेवता येत नाहीतनिर्बंधांनंतर प्रश्नचिन्हरिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे आर्थिक निर्बंध लादण्याचा निर्णय नुकताच घेतला. यामुळे रिझर्व्ह बँक अधिकारी पतसंस्थेच्या तब्बल १०५ कोटींच्या ठेवींच्या भवितव्यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :पीएमसी बँकभारतीय रिझर्व्ह बँक